प्राथमिक शाळांमध्ये मोदींचा वाढदिवस साजरा होणार; रविवार असूनही विद्यार्थ्यांना उपस्थिती सक्तीची

उत्तर प्रदेशातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मोदींच्या वाढदिवशी रविवार आहे. तरीही सर्व शाळा सुरू राहणार असून विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यात १.६० लाख प्राथमिक शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनुपमा जैस्वाल यांनी दिली. मतदारसंघातील दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये त्या-त्या आमदारांनी उपस्थित राहावे. मोदींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आणि त्याचे महत्त्व त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना समजून सांगावे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केल्यास मोदींचे ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या. स्वच्छतेचे महत्त्व आणि त्याबाबत जनजागृती केल्यास मोदींसाठी ती वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल, असेही त्या म्हणाल्या. मोदींच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित आमदारांना दिल्या.

मोदी हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. मुलांसमोरील एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील बलशाली व्यक्ती आहेत, असे भाजपचे प्रवक्ते चंद्रमोहन यांनी सांगितले. स्वच्छतेचा प्रसार आणि मुलांमध्ये त्याबाबत जागृती करणे हा शाळांमध्ये पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *