रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच; शक्तीपुंज एक्स्प्रेसचे ७ डबे घसरले

उत्तर प्रदेशच्या सोमभद्रमध्ये शक्तीपुंज एक्स्प्रेसचे ७ डबे रुळांवरुन घसरले आहेत. शक्तीपुंज एक्स्प्रेस हावड्याहून जबलपूरला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातावेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने अनर्थ टळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. महिन्याभरात उत्तर प्रदेशात झालेला हा तिसरा रेल्वे अपघात आहे.

अपघातावेळी शक्तीपुंज एक्स्प्रेसचा वेग ४० किलोमीर प्रतितास इतका होता. त्यामुळे भीषण अपघात टळला. महिन्याभरात उत्तर प्रदेशात तीनवेळा रेल्वे गाड्यांना अपघात झाल्याने रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २३ ऑगस्टला आजमगढहून दिल्लीला जाणाऱ्या कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे इंजिनासह घसरले होते. या अपघातात ७४ प्रवाशी जखमी झाले. औरैया जिल्ह्यातील अछल्दा आणि पाता रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला होता.

त्याआधी १९ ऑगस्टला उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरच्या खतौलीमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे १२ डबे रेल्वे रुळांवरुन घसरले होते. या अपघातात २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास १०० प्रवासी जखमी झाले होते. उत्कल एक्स्प्रेस पुरीहून हरद्वारला जात होती. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला होता. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी रेल्वे रुळांचे काम सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *