अरे वाह!…८० वर्षांनी आलं ‘गुलाबी’ चॉकलेट

आतापर्यंत ‘डार्क चॉकलेट’, ‘व्हाइट चॉकलेट’, ‘मिल्क चॉकलेट’ हेच प्रकार आपल्याला माहिती होते. अगदी खाण्यापासून ते सौंदर्य खुलवण्यासाठी चॉकलेटचा वापर जगभरात सर्रास केला जातो. त्यामुळे चॉकलेटचे हे तिन्ही प्रकार चांगलेच परिचयाचे झाले आहेत. पण एका स्वित्झर्लंडच्या कंपनीनं ८० वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचे चॉकलेट तयार केले आहे. १९३० नंतर चॉकलेटचा नवा प्रकार तयार करण्यात या कंपनीला यश आलंय. ‘रुबी’ चॉकेलट असं त्याचं नाव आहे. हे चॉकलेट फिकट गुलाबी रंगाचं आहे.

रुबी कोकोआ बीन्सपासून गुलाबी रंगाचं रुबी चॉकलेट तयार करण्यात आलंय. झ्युरिक स्थित कंपनी बेरी कॉलेबटनं हे नवीन चॉकलेट तयार केले आहे. एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, १९३० साली व्हाईट चॉकलेट तयार करण्यात आले होते. त्यानंतर आठ दशकांनी हे नवे चॉकलेट तयार करण्यात आले असून ते चॉकलेटप्रेमींना चाखायला मिळणार आहे. आंबट, गोड, क्रिमी, फ्रुटी अशी मिश्र चव या चॉकलेटची असेल, असं कंपनीनं सांगितलं आहे. अंदाजे दीड वर्षाने हे चॉकलेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. या चॉकलेटची किंमत किती असेल हे मात्र अद्याप समजले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *