रिझर्व्ह बँकेने नव्याने चलनात आणलेली २०० रूपयांची नोट प्रत्यक्षात नागरिकांच्या हातात येण्यासाठी आणखी बराच कालावधी जावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. कारण या नोटेसाठी सध्या वापरात असलेल्या ATM मशिन्समध्ये काही बदल करावे लागणार आहेत. हे बदल केल्यानंतरच २०० रूपयांच्या नोटा ATM मधून काढता येतील.
सध्या अनेक बँकांनी आपापल्या एटीएम मशिन्समध्ये आवश्यक बदल करण्याचे काम हाती घेतलेय. यासाठी सध्या २०० रूपयांच्या नव्या नोटेचे परीक्षण सुरू आहे. मात्र, अद्याप बँकापर्यंतही या नोटा पुरेशा प्रमाणात न पोहोचल्यामुळे या कामात अडथळे येत आहेत. यापूर्वी नोटाबंदीनंतर जेव्हा ५०० आणि २००० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या होत्या, तेव्हाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांच्यादृष्टीने ATM मशिन्स अनुकूल बनवण्यासाठी बराच कालावधी लागला होता. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
२०० रूपयांच्या नोटा लवकरच बाजारपेठेत येतील, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले तरी त्यांचा पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होईल, याबाबत निश्चित माहिती दिली नव्हती. अजूनपर्यंत ATM कंपन्यांनाही रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, काही बँकांनी २०० रूपयांच्या नोटेचा आकार वेगळा असल्यामुळे स्वत:हून नव्या नोटांचे परीक्षण करायला सुरूवात केलीये. सध्याच्या घडीला देशभरात तब्बल २.२५ लाख ATM मशिन्स कार्यरत आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने मशिन्समध्ये बदल करावे लागणार, हा मुद्दा विचारात न घेताच २०० रूपयांच्या नोटा चलनात कशा आणल्या, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
रिझर्व्ह बँकेचे आदेश आल्यानंतरच ATM मशिन्समध्ये बदल करण्याचे काम हाती घेण्यात येईल. सध्या चलनात असणाऱ्या नोटांपेक्षा २०० रूपयांच्या नोटांचा आकार वेगळा आहे. त्यामुळे नव्या नोटा मिळाल्यानंतरच त्यांचे निरीक्षण करून ATM मशिन्समध्ये बदल करणे आम्हाला शक्य होईल. त्यानंतर या नोटांचा पुरवठा हा मुद्दाही महत्त्वाचा आहे, अशी माहिती एजीएस ट्रांसेक्ट टेक्नोलॉजी लिमिटेडचे अध्यक्ष रवी गोयल यांनी दिली. या कंपनीकडून देशभरात आतापर्यंत ६० हजार ATM मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. ATM मशिन्समध्ये आवश्यक बदल करण्यासाठी साधारण ९० दिवसांचा कालावधी लागेल. मात्र, या काळात ATM मशिन्सच्या दैनंदिन कामावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, सध्या देशात एनसीआर कॉर्पोरेशन आणि बीआयटी पेमेंटस या कंपन्याही ATM मशिन्स तयार करणाऱ्या काम करतात. या कंपन्यांच्या मालकीची अनुक्रमे १,०८,००० आणि ४५०० ATM मशिन्स देशभरात कार्यरत आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी २०० रूपयांच्या नोटांचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ATM मशिन्समध्ये बदल करण्याचे काम हाती घेता येईल, असे सांगितले. सध्या केवळ रिझर्व्ह बँकेच्या मुद्रणालयातच २०० रूपयांच्या नोटांची छपाई सुरू आहे. देशात रिझर्व्ह बँक आणि सुरक्षा प्रिंटिंग अॅंड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसपीएमसीएल) या दोन संस्थांकडेच नोटांची छपाई करण्याचे अधिकार आहेत. या दोन्ही संस्थांची प्रत्येकी दोन मुद्रणालये आहेत.
