नाशिक-पुणे महामार्गावर ‘लाल चिखल’; भाव कोसळल्याने टोमॅटो ओतले रस्त्यावर

शनिवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाली़ मात्र, दर अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी पुणे-नाशिक महामार्गावर टोमॅटो ओतून रास्ता रोको आंदोलन केले़ रस्त्यावरच टोमॅटोचा लाल चिखल करुन शेतक-यांनी आपला रोष व्यक्त करीत भाव वाढीची मागणी केली़
शनिवारी संगमनेरचा आठवडे बाजार भरतो़ बाजारामुळे टोमॅटोला चांगला भाव मिळेल, या आशेने परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते. बकरी ईद असल्याने अनेक व्यापा-यांनी आपले लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे टोमॅटोचे भाव ६०० ते ७०० रुपयांवरून थेट २०० ते ३०० रूपयांपर्यंत घसरले़ अचानक कमी झालेल्या भावामुळे संतप्त शेतक-यांनी बाजार समिती समोरच वाहने आडवी लावत रास्ता रोको सुरू केला. यामुळे काही काळ महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अचानक भाव कोसळल्याने तालुक्यातील विविध गावातील शेतक-यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकत आपला रोष व्यक्त केला. वातावरण तणावपूर्ण बनल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, पोलीस उपनिरीक्षक शंकरसिंग रजपूत हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच तहसीलदार साहेबराव सोनवणे हे देखील घटनास्थळी आले़ त्यांनी शेतकºयांची समजूत काढत रास्ता रोको मागे घेण्यास शेतक-यांना भाग पाडले़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *