वयाच्या २१ व्या वर्षी सीए, सीएस आणि सीएमए परीक्षा उत्तीर्ण होऊन नोंदवला विक्रम

सुरतचा (गुजरात) आदित्य झावर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षीच चार्टर्ड अकाऊंटंट (सीए), कंपनी सेक्रटरी (सीएस) आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंसी (सीएमए) परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. अशी कामगिरी करणारा आदित्य सर्वांत कमी वयाचा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम दिल्लीच्या सार्थक आहुजा आणि पल्लवी सचदेवा यांच्या नावे होता. या दोघांनी वयाच्या २३ व्या वर्षी सीए, सीएस आणि सीएमए परीक्षा उत्तीर्ण केली होती. आता आदित्यने सीएमएची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होताच सर्वांना मागे टाकले. सीएमएचा निकाल शनिवारी (दि.२६) लागला. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आदित्यने सीएचा अभ्यास सुरू केला होता. त्याचबरोबर सीएसचाही अभ्यास सुरू केला. दोन्ही परीक्षा तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने सीएमएची तयारी सुरू केली होती. तीही परीक्षा आता तो उत्तीर्ण झाला आहे.

आदित्य सुरतमधील सीए रवी छावछरिया यांच्याकडे प्रशिक्षण घेतो. त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून (इग्नू) वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. तो आता बी.कॉमच्या अंतिम वर्षाच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहे. आदित्यचे वडील एक कापड व्यापारी आहेत. त्यांनी सीए परीक्षेचा दुसरा टप्पा उत्तीर्ण केलेला आहे. परंतु, कौटुंबिक व्यवसायामुळे ते सीए पूर्ण करू शकले नाहीत. आदित्यची आई शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

सीए परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नसते, असे मानले जाते. ही सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्याला फाऊंडेशन, आयपीसीसी आणि फायनल असे तीन टप्पे उत्तीर्ण होण्याबरोबर आर्टिकलशीपही करावी लागते. दरवर्षी आर्थिक जगतात होत असलेल्या बदलामुळे भारतीय चार्टर्ड अकाऊंटट्स या संस्थेने (आयसीएआय) सीए परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *