भद्रावती येथील पॉवर ग्रीडमधील अभियंता धर्मेद्रकुमार खोब्रागडे (४२) यांचा वाहनतळावर कार ठेवतानाच कारमध्ये भीषण स्फोट होऊन आग लागल्याने जळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. कारमध्ये स्फोट नेमका कसा झाला याचा शोध भद्रावती पोलिस घेत आहेत.
अभियंता धर्मेद्रकुमार खोब्रागडे पॉवर ग्रीडच्या वसाहतीमधील गाळ्यात वास्तव्याला होते. शनिवारी सकाळी ते कारने (सी.जी.०७-एम-९१२६) भद्रावती शहरात आले होते. भद्रावतीतून ते पुन्हा पॉवर ग्रीडला कार्यालयापर्यंत गेले. तिथे वाहनतळावर कार पार्क करीत असतांना अचानक कारमध्ये स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की कार जळायला लागली. यात अभियंता खोब्रागडे यांना कारच्या बाहेर पडता आले नाही व ते सुध्दा जळायला लागले. अवघ्या काही मिनिटात अभियंता खोब्रागडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वसाहतीत वाऱ्यासारखी पसरली. भद्रावतीचे पोलिस निरीक्षक विलास निकम, सहायक पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकले तात्काळ घटनास्थळी पथक घेऊन दाखल झाले. यावेळी खोब्रागडे यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, हा स्फोट नेमका झाला कशामुळे त्याचे कारण गुलदस्त्यात आहे. ही कार पेट्रोलवर चालणारी होती. त्यामुळे कारमध्ये काही तांत्रिक दोष होता आणि त्यामुळे तर हा स्फोट होऊन आग लागली नाही ना, अशीही चर्चा आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. खोब्रागडे यांच्या मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले. अचानक झालेल्या या स्फोट आणि आगीत एका तरूण अभियंत्याला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
