परीक्षेत आपल्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या वर्गमैत्रिणीवरच विषप्रयोग

आपल्यापेक्षा जास्त गुण मिळवल्यामुळे वाटलेल्या असूयेपोटी आठवीतल्या एका मुलीने पाण्याच्या बाटलीत विषारी द्रव्य मिसळून तिच्या मैत्रिणीवर विषप्रयोग केल्याची घटना मध्य प्रदेशातील सतना येथे घडली. या घटनेची पोलिसांकरवी चौकशी होण्याच्या भीतीने आरोपी मुलीने नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून तिची प्रकृती गंभीर आहे.

सतना शहरातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या या मुलीने सोमवारी तिच्या मैत्रिणीच्या पाण्याच्या बाटलीत डास प्रतिबंधक द्रवपदार्थ (मॉस्किटो रिपेलेंट) मिसळला. नंतर हे पाणी प्यायल्यावर संबंधित मुलीने बेचैन वाटत असल्याची तक्रार केली व तिला उलटय़ा होऊ लागल्या. सध्या तिच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे, असे पोलीस निरीक्षक भूपेंद्र सिंह यांनी सांगितले.

१३-१४ वर्षे वयाच्या या दोन्ही मुली एकाच वर्गात शिकतात. बाटलीतून पाणी प्यायल्यानंतर पीडित मुलीला काहीतरी वेगळे वाटले आणि त्याला डास प्रतिबंधक पदार्थासारखा वास येत असल्याचे ती म्हणाली. तिला बेचैन वाटू लागल्यानंतर शाळा प्रशासनाने तिच्या पालकांना कळवले व त्यांनी तिला रुग्णालयात हलवले. नंतर शाळेच्या शिक्षकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

वर्गखोलीच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी मुलगी मैत्रिणीच्या पाण्याच्या बाटलीत द्रवपदार्थ मिसळत असल्याचे व ती बाटली दुसऱ्या विद्यार्थिनीच्या दप्तरात लपवत असल्याचे दिसून आले. आपण परीक्षेत आरोपी मुलीपेक्षा अधिक गुण मिळवल्यामुळे तिने असे केले असावे असा आपल्याला संशय आहे, असे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, आरोपी विद्यार्थिनीने नंतर स्वत:च्या घरी हेच विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत, असे सिंह म्हणाले. या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीवर विषप्रयोगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *