आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी संप केल्याने बुधवारी सकाळी 8:30 वाजताच्या बातम्या प्रसारित झाल्या नाहीत. आकाशवाणीच्या इतिहासातील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित न होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. 4 जून पासून हे बातमीपत्र दिल्लीऐवजी मुंबईतून प्रसारित केले जात आहे. मात्र, बातमीपत्र प्रसारित करण्यासाठी सुविधा नसल्याचे मुंबई केंद्राने यापूर्वी कळवले होते व संपाचा इशाराही दिला होता. अखेर मंगळवारपासून कंत्राटी वृत्तनिवेदकांनी संप पुकारल्याने याचा परिणाम बातमीपत्रावर बसला आहे.
पूर्वी पुणे आकाशवणी केंद्रावरून सकाळी 8.30 वाजता, दुपारी 1.30 वाजता आणि रात्री 8.30 वाजता ही राष्ट्रीय बातमीपत्र प्रायोजकत्व घेऊन प्रसारित व्हायची. याद्वारे शासनाला 4 कोटी रुपयांचा महसूलदेखील मिळायचा. मात्र केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही बातमीपत्र मुंबईमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठीची आमच्याकडे सुविधा उपलब्ध नाही, असे सांगूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ही बातमीपत्र मुंबईवरून प्रसारित होत असून त्याचे पद हे पुण्याला देण्यात आले आहे. तर दुसरीकडे, सकाळचे 8.30 वाजताचे बातमीपत्र पुणे आकाशवाणी केंद्र प्रसारित करायला तयार आहे, ते आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी पुणे केंद्रानं केली आहे.
