शेवगाव सामुहिक हत्याकांडातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

नगर जिल्यातील शेवगावातील सामुहिक हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीने बुधवारी पोलीस कोठडीत आत्महत्या केली. अमोल पिंपळे असं आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील महिन्यात शेवगावमध्ये दरोड्याच्या उद्देशाने एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य सुत्रधार रम्या भोसले याच्यासह अल्ताप भोसले, उमेश भोसले आणि अमोल पिंपळे यांना अटक करण्यात आली. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मुख्य सुत्रधार असणाऱ्या रम्या भोसलेने संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिली. या हत्येप्रकरणातील आणखी एक आरोपी परमसिंग अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

शेवगाव येथील विद्यानगर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी व माजी सैनिक आप्पासाहेब हारवणे (वय ५८), त्यांची पत्नी सुनंदा आप्पासाहेब हारवणे (वय ४८), मुलगा मकरंद हारवणे (वय १४), मुलगी स्नेहल आप्पासाहेब हारवणे (वय १९) यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. गुंगीचे औषध फवारून मारेकऱ्यांनी त्यांची गळे कापून हत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रम्या भोसले आणि परमसिंग भोसले हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी संगनमताने शेवगावमध्ये दरोड्याचा कट रचला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *