कोल्हापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार, तीन मुलींचे लैंगिक शोषण

कोल्हापुरातल्या राजेंद्र नगर भागातील कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये काम करणाऱ्या शिक्षकानं विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढंच नाही तर शाळेतील इतर तीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकारही समोर आला आहे. याबाबत पीडित मुलीनं आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात क्रीडा शिक्षक विजय मनगुडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांनी रात्री उशिरा या नराधमाला ताब्यात घेतलं आहे. विजय मनगुडे हा कोल्हापूर पब्लिक स्कूल या शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून मागील आठ वर्षांपासून काम करतो.

शाळेतील मुलींचा हॉकी संघ तयार करण्याची जबाबदारी या शिक्षकावर होती, यासाठी त्याने १३ ते १५ या वयोगटातील मुलींची निवड केली. मे महिन्यापासून विजय मनगुडे या मुलींचा सराव घेत होता. या मुलींपैकी काही मुलींसोबत लगट करून त्यांच्यासोबत तो अश्लील चाळे करत होता अशी माहितीही समोर आली आहे.

क्रीडा गणवेशाचे माप घेण्याच्या निमित्तानं त्यानं हॉकी संघातील एका मुलीला शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वर्गात नेले, त्यानंतर या मुलीवर या शिक्षकाने बलात्कार केला. याबाबत तोंड उघडलेस तर तुला हॉकी संघातून काढून टाकेन आणि तुझी बदनामी करेन अशी धमकीही दिली. यानंतर तीन ते चारदा असाच प्रकार घडला.. यापैकी एका वेळी विजय मनगुडे पीडित मुलीला स्वतःच्या घरी घेऊन गेला तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसंच इतर तीन मुलींचेही लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे.

मे महिन्यापासूनच विजय मनगुडे हा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करत होता, कोणाकडे अवाक्षर काढाल तर तुमची बदनामी करेन अशी धमकीच त्यानं या चारही मुलींना दिली होती. त्रास असह्य होऊ लागला तेव्हा या मुलीने आपल्या पालकांना विश्वासात घेऊन सगळा प्रकार सांगितला. पालकांसाठी हा धक्काच होता, ज्या शिक्षकाकडे विश्वासानं आम्ही मुलींना पाठवलं त्यानेच असा प्रकार केला अशी माहिती या मुलीच्या पालकांनी पोलिसांना दिली आणि या नराधम शिक्षकाविरोधात तक्रारही केली. पोलिसांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तक्रार नोंदवून घेतली आणि इतर तीन विद्यार्थिनींच्या पालकांनीही राजरामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एवढंच नाही तर या शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *