सांगली पोलीस मुख्यालय परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

सांगली पोलीस मुख्यालयाच्या परिसरातून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी झाली. २० ते २५ वयोगटातील सात-आठ जणांनी बुधवारी मध्यरात्री करवतीच्या साहाय्याने मुख्यालय परिसरातील तीन झाडे कापली. त्यानंतर दोन ओंडके घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सांगली मुख्यालयातील हॉलच्या शेजारी घनदाट झाडी आहे. बुधवारी मध्यरात्री सात ते आठ जणांनी या परिसरात घुसून करवतीच्या साहाय्याने तीन झाडे कापली. झाडाच्या फांद्या काढून दोन ओंडके त्यांनी चोरुन नेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. मागील आठ महिन्यातील चंदनाच्या झाडांच्या चोरीची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी देखील मुख्यालयातील परिसरातून अशा प्रकारची चोरी झाली होती. यावेळी आरोपींना पकडण्यात पोलीसांना अपयश आले होते. पोलिसांनी याप्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असता तर आज पुन्हा चोरी झाली नसती, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *