मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आता ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेत गुरूवारी यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा ‘वंदे मातरम’ गीत गाणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक होऊ शकते.
काही दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील शाळा-महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम् बंधनकारक करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मुंबईतील भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी या मागणीचा प्रस्ताव मांडला होता. महापालिका आणि सर्व अनुदानित शाळांमध्ये वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाणं अनिवार्य करण्यात यावं, असे त्यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले होते. भावी पिढीत देशभक्ती जागृत राहावी यासाठी शाळांमध्ये आठवड्यातून किमान दोनदा वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गायला हवं. महापालिका सभागृहाच्या धर्तीवर स्थायी, सुधार आणि अन्य समित्यांच्या कामकाजालाही वंदे मातरम् या गीतानं सुरुवात करायला हवी, असेही त्यांनी सांगितले होते.
या प्रस्तावावर आज पालिकेत चर्चा झाली व त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी तामिळनाडूतील प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वंदे मातरम गायलाच हवं. आठवड्यातून किमान एकदा तरी हे राष्ट्रीय गीत गायला हवं, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. सरकारी कार्यालये, संस्था, खासगी कंपन्या आणि अन्य कारखान्यांमध्ये महिन्यातून किमान एकदा हे राष्ट्रीय गीत गायला हवं. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाण्यास कुणाचा आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही. पण त्याचं कारण वैध असलं पाहिजे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आपण वंदे मातरम् म्हणणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्याचे पडसाद राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते. भाजप आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अबू आझमी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. या देशात राहायचं असल्यास वंदे मातरम् म्हणावंच लागेल, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता.
