मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चाहून परतताना झालेल्या अपघातांमध्ये औरंगाबादमधील तीन, पुण्यातील एकाच तर मुंबईतील दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील वडाळा परिसरात काल संध्याकाळी ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. तर औरंगाबादमध्ये नांदगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल अनिल घोलप (वय, २८, रा. गावठाण, रुकडी पुणे), नारयण कृष्णा थोरात (वय, २१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे आणि गौरव प्रजापती (वय, २३, रा. बजाज नगर, जि. औरंगाबाद) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी वैजापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत बुधवारी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावरून संध्याकाळी सहाच्या सुमारास विनायक ढगे, विल्सम जोसेफ, सिद्धार्थ म्हसे आणि सिद्धार्थ चव्हाण हे मोटरसायकलवरून चेंबूर येथे घरी परतत असताना अपघात झाला होता. भक्ती पार्क मोनोरेल स्थानकाजवळ एका ट्रकने त्यांना उडवले. या अपघातात विनायक आणि सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला होता. तर सिद्धार्थ चव्हाण हा गंभीर जखमी आहे.
