केएफसीमध्ये तळलेलं चिकनऐवजी तळलेलं उंदीर सर्व्ह केल्याने खुपच वाद झाला होता. परंतु हा वाद पूर्णत: थांबलेला नाही. अमेरिकेची आणखी एक फूड चैन कंपनी वादात सापडली आहे. ती कंपनी आहे मॅकडॉनल्ड्स.
एका ग्राहकाने बुरशी लागलेला बर्गर सर्व्ह केल्याची तक्रार मॅकडॉनल्ड्सकडे केली आहे. लंडनमधील एडवर्ड नावाच्या या ग्राहकाने मॅकडॉनल्ड्समधील बुरशी लागलेल्या बर्गरचे दोन फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. आश्चर्य म्हणजे हे फोटो तब्बल 68,000 वेळा शेअर झाले आहेत.
एडवर्डने त्याच्या फेसबुक पेजवर हे फोटो पोस्ट करुन लिहिलं आहे की, “मला हॉलबॉर्नच्या मॅकडॉनल्ड्समध्ये हा बर्गर सर्व्ह केला होता. पण या बनवर लागलेली बुरशी पाहा. याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी मला 15 पौंडचा व्हाऊचर हातात ठेवलं. यानंतर सोशल मीडियावर या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर लोकांनी आपापले अनुभव सांगत मॅकडॉनल्ड्सवर जोरदार टीका केली.
या सगळ्या प्रकारानंतर मॅकडॉनल्ड्सने परिपत्रक जारी करुन त्यांचं म्हणणं मांडलं. या परिपत्रकात म्हटलं आहे की, “4 जून रोजी याबाबतची सूचना मिळाल्यानंतर आम्ही एडवर्डची माफी मागत त्यांचे पैसे परत केले. या प्रकाराचा तपास सुरु आहे.” मॅकडॉनल्ड्सच्या दाव्यानुसार, “एडवर्डने अव्वाच्यासव्वा रक्कम भरपाई म्हणून मागितली होती.”

