नोकरीची शाश्वती नसल्याने पुण्यात २५ वर्षाच्या आयटी इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा आंध्रप्रदेशचा आहे. तीन दिवसांपूर्वीच तो पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागला होता.
आंध्रप्रदेशमध्ये राहणारा २५ वर्षाचा गोपीकृष्ण दुर्गाप्रसादने पुण्यापूर्वी दिल्ली, हैदराबादमधील आयटी कंपनीमध्ये काम केले होते. तीन दिवसांपूर्वीच तो पुण्यातील आयटी कंपनीमध्ये कामाला लागला होता. कंपनीतर्फे त्याची विमान नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. बुधवारी पहाटे गोपीकृष्णने हॉटेलच्या खोलीत हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. त्याने हाताच्या मनगटावर तब्बल २५ वेळा चाकूने वार केले. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरल्यावर तो हॉटेलच्या गच्चीवर गेला आणि तिथून उडी मारली. पहाटे चारच्या सुमारास हॉटेलच्या मॅनेजरने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गोपीकृष्णला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
आत्महत्येपूर्वी गोपीकृष्णने सुसाईड नोट लिहीली होती. यात तो म्हणतो, ‘आयटी क्षेत्रात आता नोकरीची शाश्वती नाही. मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटते.’ गोपीकृष्णच्या नातेवाईकांनीही त्याने टोकाचे पाऊल का उचलले यावर आश्चर्य व्यक्त केले. ‘गोपीकृष्ण चांगला मुलगा होता. त्याचे कामही चांगले होते. त्याला कोणतेही व्यसन नव्हते’ असे गोपीकृष्णच्या नातेवाईकांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर गोपीकृष्णचे पार्थिव आंध्रमधील मूळगावी पाठवण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, गोपीकृष्णच्या आत्महत्येनंतर आयटी क्षेत्रातील भीषण वास्तव समोर आले आहे. आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे. आता कर्मचारी कपातीविरोधात लढा देण्यासाठी युनियनची स्थापना करण्याचा निर्धार आयटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
