वादग्रस्त कोंढाणे धरण सिडकोच्या ताब्यात!

२७० गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय; भ्रष्टाचाराची चौकशी सुरूच

रायगड जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यातील वादग्रस्त ठरलेले कोंढाणे धरण सिडकोकडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने सोमवारी मान्यता दिली. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ परिसरात येणाऱ्या २७० गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय या धरणामुळे होणार आहे. मात्र, या प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) सुरूच राहणार असल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात कोंढाणे प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यापासून ते उंची वाढविणे व खर्चात झालेली वाढ असे वादाचे मुद्दे ठरले आहेत. त्यावरून तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याची एसीबीमार्फत सध्या चौकशी सुरू आहे.

 सिडकोच्या वतीने नवी मुंबई विमानतळ बांधण्यात येत आहे. ‘नैना’ म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या २७० गावांच्या पिण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा विभागाकडून कोंढाणे धरण ‘जसे आहे त्या स्थितीत’ सिडकोकडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी  दिली. त्याचबरोबर सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या या धरणाला पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून घोषित करण्यासही या वेळी मान्यता देण्यात आली.
  • या प्रकल्पासाठी आजपर्यंत झालेल्या बांधकामाचे मूल्यांकन करून हा खर्च सिडकोने कोकण पाटबंधारे विकास महामंडळास द्यावयाचा आहे. जलसंपदा विभागाकडून सिडकोकडे हा प्रकल्प हस्तांतरित केला जात असला तरी, एसीबीमार्फत सुरू असलेली चौकशी कोणत्याही प्रकारे बाधित होणार नाही, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *