आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा मंगळवारी पहाटे अडीच वाजता भक्तीमय वातावरणात झाली. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. महापूजेवेळी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जलसंपदा, संसदीय कार्यमंत्री तथा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा़ रविंद्र गायकवाड, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजीमंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, ग्रामीण पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान यंदा विठ्ठल-रखमुमाई मंदिरातील पूजेचा मान बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) दांपत्याला मिळाला. अनुसया (वय ४२) यांना मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेरत दांपत्याचा सत्कारही करण्यात आला.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून सावळ्या विठूरायांच्या दर्शनासाठी वारकरी मोठया संख्येने पंढरीत दाखल झाले आहेत़ दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली आहे़ सध्या अवघे पंढरपूर भक्तिरसात तल्लीन झाले असून पहाटे स्नान करुन वारक-यांनी भजनांना सुरूवात केली. तर हजारो भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्या आटोपून शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने पंढरीत दाखल झालेला पाहायला मिळत आहे.