पंजाब-राजस्थान वगळता देशभरात मोसमी वारे
पावसाने पुन्हा एकदा पालघर जिल्ह्य़ाला झोडपून काढले आहे. जव्हार तालुक्यात तब्बल ४१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोखाडा, तलासरी या तालुक्यांत तसेच ठाणे जिल्ह्य़ात अंबरनाथ, उल्हासनगर येथेही मुसळधार पाऊस पडला.
उत्तर कोकणात पावसाने जोर धरला असला तरी राज्याच्या इतर भागात मात्र पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार नाही, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
गुजरातपासून केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर चांगला पाऊस पडत असून, पंजाब व राजस्थानचा वायव्येकडील भाग वगळता देशात इतरत्र मोसमी वारे पोहोचले आहेत. राज्यात उत्तर कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.
रविवारी सकाळच्या नोंदीप्रमाणे पालघरमधील जव्हार तालुक्यात २४ तासांत ४१५ मिमी पाऊस पडला. (२६ जुलै २००५ रोजी मुंबईत सांताक्रूझ येथे ९५३ मिमी पावसाची नोंद झाली होती.)
मोखाडा येथे २१० मिमी, डहाणू येथे ११६ मिमी तर तलासरी येथे १४५ मिमी पाऊस पडला. गेल्या आठवडय़ातही शनिवारी पावसाने पालघरला झोडपले होते. तेव्हा तलासरी तालुक्यात एका दिवसात ४६८ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पालघर वगळता ठाणे व नाशिकमधील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. ठाणे शहरात १२२ मिमी, अंबरनाथ येथे १३७ मिमी, उल्हासनगर येथे १८३ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिकमध्ये त्रिबंकेश्वर या पालघरपासून जवळच असलेल्या ठिकाणी १४२ मिमी पाऊस पडला. मुंबई उपनगरात गेले दोन दिवस सकाळी पावसाच्या मुसळधार सरी येत असून त्यानंतर दिवसभर मात्र पाऊस उसंत घेत आहे. रविवारी सांताक्रूझ येथे ४९ मिमी तर कुलाबा येथे अवघ्या ५ मिमी पावसाची भर पडली. जूनमध्ये सरासरीएवढा पाऊस पडला असला तरी गेल्या पाच वर्षांत २०१४ चा अपवाद वगळता हा सर्वात कमी पावसाचा महिना ठरला.
पर्जन्यभान
मुंबई ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीत काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता असली तरी पुढील पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथे पावसाचा जोर कमी राहील. तीन दिवसानंतर विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात मराठवाडय़ात दमदार पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने मराठवाडय़ाकडे पाठ फिरवली असून या आठवडय़ातही मराठवाडय़ातील जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असे हवामान विभागाचा अंदाज सांगतो.
चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ांत रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली असून शेतकरी सुखावला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट होते. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली असून पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झालेला आहे.
