अपहरण केलेल्या अडीच वर्षांच्या मुलाची व्हॉट्सअॅपवर विक्री

गुन्हा कधी लपून राहत नाही, असं म्हटलं जातं. अनेक गुन्ह्यांची उकल सोशल नेटवर्किंग साईट्सवरून झाल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. नवी दिल्लीतील पोलिसांनीही अशाच एका गुन्ह्याची उकल सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. एका अडीच वर्षांच्या मुलाचं अपहरण केल्यानंतर त्याला विकण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी हाणून पाडला आहे. मुलाच्या विक्रीतून अधिक पैसे मिळतील, या लालसेपोटी महिलेनं त्याचा फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपलोड केला. तसंच १ लाख ८० हजार रुपये किंमत निश्चित केली. अपहरण केलेल्या मुलाचा फोटो व्हॉट्सअॅपवर टाकणं त्या महिलेला महागात पडलं. पोलिसांनी या महिलेसह तिच्या तिघा साथीदारांना बेड्या ठोकल्या. त्यात दोन महिलाही आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुले दत्तक घेणाऱ्या रॅकेटमध्ये या अटक केलेल्या तीन महिला सामील होत्या. या महिलांनी अडीच वर्षांच्या मुलाचं जामा मशीदीजवळून अपहरण केलं होतं. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी त्याला अनेक ठिकाणी नेलं होतं. अपहृत मुलाच्या विक्रीतून जास्त पैसे मिळवायचे होते. त्यासाठी त्यांनी त्या मुलाचा फोटो एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपलोड केला. फोटो व्हायरल झाल्यानंतर एका व्यक्तीनं त्याबाबत पोलिसांना कळवलं. आपल्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागल्याचे कळताच त्यांनी मुलाला एका मंदिराजवळ सोडलं आणि त्याची माहिती पोलिसांना दिली. पण पोलिसांना माहिती देणं या महिलांच्या अंगलट आलं. पोलिसांनी तपास करून या तीन महिलांसह चौघांना अटक केली. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला होता. खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून अपहरणकर्त्यांना अटक केली.

जामा मशिदीजवळून ५ जूनला मुलाचं अपहरण केलं होतं. रॅकेटमधील राधा नावाच्या महिलेनं त्याला काही दिवस आपल्या घरी ठेवलं. त्यानंतर त्या मुलाला तिनं साथीदार असलेल्या सोनियाला एक लाख रुपयांना विकलं. सोनियानंही १ लाख १० हजार रुपये घेऊन ते मूल आणखी एक साथीदार सरोज हिला विकलं. मुलाच्या विक्रीतून आणखी पैसे मिळतील, या लालसेने सरोजनं या मुलाचा फोटो एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपलोड केला आणि १ लाख ८० हजार रुपयांना मुलगा विकायचा आहे, असं ग्रुपमधील सदस्यांना सांगितलं. या मुलाचा फोटो व्हायरल झाला. एका व्यक्तीनं हा फोटो पाहिला. त्यानं याबाबत पोलिसांना कळवलं. त्याचदरम्यान या महिलांनी पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी मुलाला एका मंदिराजवळ सोडलं आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी महिलेचा मोबाईल नंबर ट्रॅक केला. त्यामुळं महिलेचा शोध घेण्यास मदत झाली. पोलिसांनी महिलेला अटक केली. चौकशीत तिने दिेलेल्या माहितीवरून तिच्या इतर महिला साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *