सौदीच्या राजपरिवारात उलथापालथ ! राजाने आपल्याच मुलाला निवडले युवराज

सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान यांनी मुहम्मद बीन नायेफ यांना युवराजपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले असून, त्यांच्या जागी महम्मद बीन सलमान या आपल्या मुलाची युवराजपदावर निवड केली आहे. सौदीचा नवा युवराज महम्मद बीन सलमान 31 वर्षांचा आहे. राज परिवाराकडून प्रसिद्धीपत्रकाव्दारे ही माहिती देण्यात आली आहे.
युवराज असल्याने मुहम्मद बीन नायेफ यांचा राजगादीवर पहिला हक्क होता. मुहम्मद बीन नायफे यांना मंत्रीपदावरुनही हटवण्यात आले आहे. नवीन युवराज महम्मद बीन सलमान सध्या सौदीचे संरक्षणमंत्री आहेत. सलमान जानेवारी 2015 मध्ये सौदीच्या राजगादीवर बसले. तो पर्यंत महम्मद बीन सलमानबद्दल सौदी अरेबियात आणि बाहेर फार माहिती नव्हती. सलमान युवराज होते तेव्हा  महम्मदकडे रॉयल कोर्टाची जबाबदारी होती.
सौदीच्या राजाकडे सर्वाधिकार असतात. किंग सलमान यांनी ज्या प्रकारे युवराजपदावर आपल्या मुलाची निवड केली त्याने राजपरिवारातही अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण राजपरिवारात महम्मद बीन सलमानपेक्षाही अनेक वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्ती होत्या. तेलाच्या पलीकडे जाऊन अर्थव्यवस्था उभारण्याचे सौदी अरेबियाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये महम्मद बीन सलमानची भूमिका महत्वाची राहणार आहे. महम्मद बीन सलमान तरुण असल्याने सौदी अरेबियातील तरुणाईला ते अधिक जवळचे वाटू शकतात असाही त्यांच्या नियुक्तीमागे एक कयास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *