दूर-दूरवरून आलेल्या शेकडो रुग्णांचे हाल करून आणि उपचाराअभावी एका चिमुरड्याचा जीव गेल्यावर ‘मार्ड’च्या संपकर्त्या डॉक्टरांनी शुक्रवारी संप मागे घेतला.
कल्याणमधील मोहम्मद आलम व मुमताज यांचा सहा महिन्यांचा मुलगा मोहम्मद साहिल यास भाजल्यामुळे एक जुलैला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण, २ जुलै रोजी संप पुकारल्यामुळे डॉक्टर उपचारांसाठी वेळेत आले नाहीत. डॉक्टरांना बोलावण्यास आम्ही नर्सला वारंवार सांगितले, पण डॉक्टरांना येण्यास विलंब झाला. डॉक्टर आले तेव्हा मुलगा दगावला होता, असे मोहम्मद आलम यांनी सांगितले. मात्र, केईएमच्या प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला. हे बालक सुमारे ४० ते ४५ टक्के भाजले होते. त्याच्यावर योग्य उपचार सुरू होते. पण, जखमांचे प्रमाण लक्षात घेता असा पेशंट वाचणे कठीण असते. तरीही बालकाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, असा दावा केईएमच्या वतीने करण्यात आला.
डॉक्टरांच्या मान्य झालेल्या मागण्या
निवासी डॉक्टरांना दर महिना ५ हजार रुपये विद्यावेतनात वाढ १ ऑगस्ट २०१५पासून वेतनवाढ लागू अपघात विभागासह महत्त्वाच्या विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा व्यवस्थेत वाढ
डॉक्टरवर हल्ला झाल्यास गुन्हा दाखल करण्यासाठी हॉस्पिटलचे सहकार्य
कॉलेजची वाढीव फी रद्द करण्याबाबत दोन महिन्यात प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत नवीन डॉक्टरांची भरती कामाचा ताण कमी करण्यासाठी डॉक्टरांची अतिरिक्त पदे पेशंटच्या नातेवाईकांच्या संख्येवर मर्यादा
टीबी झाल्यास रजा, प्रसुतीच्या रजेला तत्वतः मान्यता
गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आम्ही संप पुकारला होता. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी आश्वासन देण्यास नकार देत असल्याने नाइलाजाने आम्ही संप करण्याचा निर्णय घेतला. रुग्णांना वेठीस धरण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. आता ९० टक्के मागण्या शासनाने मान्य केल्याने आम्ही संप मागे घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून आम्ही पुन्हा कामावर रुजू होऊ.

