दीक्षान्त समारंभातील पाहुण्यांचे भाषण मोजक्या उपस्थितांपुढे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५७व्या दीक्षान्त समारंभात प्राप्त केलेली पदवी स्वीकारताच नाटय़गृहाचे सभागृह विद्यार्थ्यांनी सोडल्याने पाहुण्या म्हणून आलेल्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आणि माजी विदेश सचिव निरुपमा राव-मेनन यांना अध्र्यापेक्षा अधिक रिकाम्या खुच्र्यासमोर भाषण करावे लागले. मात्र त्यातही अत्यंत अभ्यासपूर्ण आणि औरंगाबाद शहराचा ऐतिहासिक इतिहास, महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा लाभलेला शैक्षणिक वारसा, याचा त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उल्लेख केला. पदवीदान समारंभात महिलांचे यश हे उल्लेखनीय असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़गृहात दुपारी ४.३० नंतर ५७व्या दीक्षान्त समारंभाला सुरुवात झाली. कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुण्या माजी विदेश सचिव निरुपमा राव, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, प्रोफेसर राजेश रगडे यांच्या उपस्थितीत पदवीदान समारंभ पार पडला. विद्यापीठाच्या परिसरात मागील दोनतीन दिवसांपासून कुलगुरू हटाव या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. त्यामुळे दीक्षान्त समारंभाच्या पाश्र्वभूमीवर काही गोंधळ होतो का, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्याची खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्तही विद्यापीठात होता. मात्र, दीक्षान्त समारंभ कुठल्याही गालबोटाविना पार पडला असला, तरी ज्या नाटय़गृहात समारंभ आयोजित केला होता त्यातील आसन व्यवस्था ८५० एवढी होती. प्रारंभी संपूर्ण नाटय़गृह खचाखच भरले होते. मात्र, प्रारंभीच कुलगुरू बी. ए. चोपडे यांच्या हस्ते पदवी घेताच विद्यार्थ्यांनी सभागृह सोडले. परिणामी अध्र्या-पाऊण तासातच सभागृह अध्र्यापेक्षा अधिक रिकामे झाले. कुलगुरू चोपडे यांचे भाषण व त्यानंतर प्रमुख पाहुण्या निरुपमा राव यांचेही भाषण ऐकण्यासाठी काही मोजकाच ‘श्रोता’वर्ग उपस्थित होता.
आपल्या भाषणात निरुपमा राव यांनी त्यांच्या विद्यार्थिदशेत तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात घालवलेला काळ, इतिहास तज्ज्ञ डॉ. रमेश गुप्ते यांच्या आठवणी, औरंगाबाद शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा, नजीकची वेरूळ अजिंठा लेणी, बौद्ध धम्माची शिकवण देणारे अनेक स्थळ आणि मूळचे आपेगावचे असलेले संत ज्ञानेश्वर यांचा कवी म्हणून त्यांनी उल्लेख केला. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या शिक्षणाला स्वातंत्र्यपूर्व, असा देदीप्यमान इतिहास असून त्याचा पाया भरणारे महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा प्रारंभीच त्यांनी उल्लेख केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे शिक्षणासाठी समर्पित असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थिदशेत बीड, जालना, नांदेड, परभणी येथील विद्यार्थ्यांचा सहवास व त्यांच्या भागातील वर्णनाने येथील जीवनाची ओळख झाल्याचे त्या म्हणाल्या. पाणी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना नेहर-ए-अंबरच्या रूपात मलिक अंबरने आपल्यासमोर ठेवला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कुलगुरू डॉ. चोपडे यांनी विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. ग्रंथालयासाठी अडीच कोटींची तरतूद केली असून ग्रंथालय हे विद्यापीठाचा आत्मा असतो, याचे भान प्रशासनाने ठेवल्याचे प्रतिपादन केले. विद्यापीठाकडून चालणारे विविध उपक्रम, त्यासाठी केलेली आर्थिक तरतूद, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी केले जाणारे उपाय, योजना, उपक्रम याची माहिती दिली.
भाषणापूर्वी निरुपमा राव यांचा पैठणी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. हमीद खान यांनी राव यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर डॉ. मझहर फारुखी, डॉ. वाल्मीक सरवदे, प्रोफेसर दिलीप खैरनार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
