नेताजींचा १९४५ मध्ये विमान अपघातातच मृत्यू , केंद्र सरकारचा दुजोरा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ मध्ये विमान अपघातातच मृत्यू झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. परंतु, नेताजींचे पणतु आणि भाजप नेते चंद्र बोस यांनी केंद्र सरकारचा हा दावा फेटाळला आहे. सरकारने नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचे सत्य जाणून घेण्यासाठी विशेष तपास समिती गठीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सरकारवर टीका करत भाजपकडून पुन्हा एकदा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

कोलकाताच्या एका व्यक्तीने माहिती अधिकारांतर्गत गृह मंत्रालयाला नेताजींच्या मृत्यूबाबत माहिती मागितली होती. विविध समितींच्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला असल्याचे सरकारचे म्हणणे असल्याचे गृहमंत्रालयाने आपल्या उत्तरादाखल म्हटले. या विमान अपघातात नेताजी बचावले होते, असे अनेकांचे म्हणणे होते. मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शाहनवाज समिती, न्या. जी. डी. खोसला आयोग आणि न्या. मुखर्जी चौकशी आयोगाच्या अहवालांचा सरकारने अभ्यास केला होता. त्याचबरोबर नेताजी हे ‘गुमनामी बाबा’या वेषात राहत होते, हेही सरकारने फेटाळले आहे.

गुमनामी बाबा हे नेताजी सुभाषचंद्र बोस नव्हते, असे मुखर्जी आयोगाने म्हटल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. गृहमंत्रालयाची वेबसाइट nic.in आणि मुखर्जी आयोगाच्या अहवालातील पृष्ट संख्या ११४-१२२ वर गुमनामी बाबा आणि भगवानजी यांच्याबाबत माहिती उपलब्ध आहे. ज्या अधिकाऱ्याने इतक्या बेजबाबदारपणे हे उत्तर दिले आहे, त्याच्याविरोधात त्वरीत कारवाई केली जावी, अशी मागणी चंद्र बोस यांनी केली आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय सरकार नेताजींच्या मृत्यूबाबत एखाद्या निर्णयापर्यंत कसे पोहोचू शकते, असा सवाल त्यांनी विचारला. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून चंद्र बोस हे कार्यरत आहेत. केंद्र सरकारने या भ्रामक वक्तव्यासाठी माफी मागितली पाहिजे आणि नेताजींच्या मृत्यूचे रहस्य समोर आणले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे काँग्रेसनेही सरकारवर टीका करत देशाचा नव्याने इतिहास लिहिला जात असल्याचा आरोप केला. सरकारने याबाबत माफी मागितली पाहिजे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

 भाजप सत्तेवर आल्यापासून स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित नेत्यांच्या बदनामी करण्याचा प्रयत्न करत केला जात आहे. जवाहरलाल नेहरू असो वा सरदार पटेल किंवा महात्मा गांधी. भाजपकडून पुन्हा एकदा इतिहास लिहिला जात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या डर्टी ट्रिक्स विभागाने नेताजींच्या मृत्यूबाबत एक कपोलकल्पित कथा रचण्यात येत असल्याचा आरोप काँगेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *