आईला हॉस्पिटलमध्ये सोडून मुलगा झाला पसार

आई-वडील आजारी पडले की मुलं त्यांना हॉस्पिटमध्ये घेऊन जातात, त्यांची काळजीही घेतात. पण काही मुलं असे प्रकार घडले की पाठ फिरवतात. असाच प्रकार घडला आहे गोरेगावमध्ये राहणाऱ्या अठ्ठावन्न वर्षीय गीता कपूर यांच्याबरोबर. 21 एप्रिल रोजी गीता कपूर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाने अॅम्बुलन्स बोलावून गीता यांना गोरेगावमधल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. गीता कपूर यांच्यावर महिनाभर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आहेत. एका महिन्यानंतर हॉस्पिटलकडून गीता कपूर यांच्या मुलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण गीता यांच्या मुलाशी हॉस्पिटलचा संपर्क झाला नाही. आपला मुलगा आपल्याला हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेल्याचं गीता कपूर यांच्या लक्षात आलं होतं.

या घटनेमुळे गोरेगावमधील एसआरव्ही हॉस्पिटल अडचणीत सापडलं आहे. गीता कपूर आता पूर्णपणे फिट आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडायचं आहे पण हॉस्पिटलचं बिल भरायला आणि डिस्चार्ज पेपरवर सही करायला कुणीही नसल्याने पुढे काय करायचं हा प्रश्न हॉस्पिटलसमोर उभा राहिला आहे. महत्त्वाचं म्हणजे हॉस्पिटलमधून सोडल्यानंतर राहण्यासाठी गीता कपूर यांच्याकडे स्वतःचं घर नाही आहे, ही गोष्टसुद्धा हॉस्पिटलच्या लक्षात आली आहे. गीता कपूर यांच्या मुलाला शोधण्यासाठी किंवा दुसरा पर्याय उपल्बध व्हावा यासाठी हॉस्पिटलकडून पोलिसांची मदत घेतली जाते आहे. एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये गीता कपूर यांच्या उपचाराचं बिल दीड लाख रूपये आहे.
गीता कपूर यांना बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  21 एप्रिल रोजी गीता कपूर यांना त्रास सुरू झाल्या नंतर त्यांच्या मुलाने हॉस्पिटलमध्ये अॅम्बुलन्ससाठी फोन केला होता. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर उपचारासाठी पैसे डिपॉझिट करण्याचं गीता यांच्या मुलाला सांगण्यात आलं होतं.  एटीएममधून पैसे काढून आणतो असं सांगत मुलाने तिथून पळ काढला होता. त्यानंतर गीता कपूर यांचा मुलगा किंवा परिवारातील एकही सदस्य हॉस्पिटलमध्ये आला नसल्याची माहिती डॉक्टर दिपेंद्र त्रिपाठी यांनी दिली आहे.
खरंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात पण खासगी हॉस्पिटलमध्ये क्वचितच असा प्रकार घडतो.  मुलगा आपल्याला हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेला आहे ही गोष्ट समजल्यापासून गीता कपूर डिप्रेशनमध्ये गेल्या आहेत. हॉस्पिटलने गीता यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाबदद्ल काही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. पण शेजाऱ्यांकडून धक्कादायक माहिती त्यांना मिळाली आहे. गीता कपूर आणि त्यांच्या मुलाने तीन महिन्याआधी त्या इमारतीमध्ये घर भाड्याने घेतलं होतं. गीता कपूर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या काही तासातच त्यांचा मुलगा घर रिकामं करून निघून गेल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे.
याप्रकरणी 2 एप्रिल रोजी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.  हॉस्पिटलच्या तक्रारीनंतर गीता कपूर यांना वृद्धाश्रमात किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करता येणार नाही. जर कपूर यांना काही झालं तर जबाबदारी कोण घेणार, अशी माहिती पोलिस अधिकारी पांडुंरंग पिटे यांनी दिली आहे. गीता कपूर यांना शोधण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला मदत करू, असंही पोलिस म्हणाले आहेत. गीता कपूर यांचा मुलगा मेसेजच्या माध्यमातून आमच्या संपर्कात आहे, लवकरच हॉस्पिटलचं बिल भरणार असल्याची ग्वाही त्यांने दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *