कांदा स्वस्त, व्यापारी मस्त!

शेतकऱ्यांकडून ४ रूपयांनी खरेदी केलेल्या कांद्याची बाजारकिंमत चारपटींत

जिल्ह्य़ातील घाऊक बाजारात सरासरी साडे चार रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणारा उन्हाळ कांदा ग्राहकांच्या हाती नाशिकमध्ये दहा ते बारा तर मुंबईत १५ ते १८ रुपये दराने पडत आहे. काही महिने शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला नुकसानीत कांदा विकावा लागत असताना दुसरीकडे शेतकरी ते ग्राहक यांच्यातील व्यापाऱ्यांची साखळी मात्र अल्पावधीत दुप्पट वा तिपटीने नफा कमावित आहे. राज्य शासनाने गतवर्षी घेतलेल्या कृषिमाल नियमन मुक्तीच्या निर्णयाचा फारसा लाभ झाला नाही. उलट कांदा नियमन मुक्त झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना फसविण्याचे प्रकार वाढल्याची तक्रार बाजार समितीचे पदाधिकारी करतात.

इतरांच्या तुलनेत अधिक आर्युमान असणारे उन्हाळ कांदा या हंगामातही शेतकऱ्यांना रडवत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानने (एनएचआरडीएफ) कांद्याचा प्रति क्विंटलला साधारणत: ९०० रुपये उत्पादन खर्च निश्चित केला आहे. म्हणजे या दरात अथवा त्याहून अधिक दराने त्याची विक्री झाल्यास उत्पादकास दोन पैसे मिळू शकतात. मागील दोन महिन्यांपासून उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. या काळात एकदाही त्याला किमान उत्पादन खर्चाइतका भाव मिळालेला नाही. या काळात प्रति क्विंटलचे (१०० किलो) दर ३५० ते ५०० रुपये सरासरीच्या दरम्यान राहिले. घाऊक बाजारात सरासरी भाव काही कांद्याला मिळतो. बहुतेकांना कांदा २०० ते ३०० रुपये या किमान दरात विक्री करावा लागतो. त्यातही धनादेशाद्वारे (रोकडरहित) होणाऱ्या व्यवहारांमुळे विकलेल्या मालाच्या पैशांसाठी व्यापारी कित्येक दिवस तिष्ठत ठेवतात, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. चांदवडच्या ऊसवाडचे शेतकरी बाळू आहेर यांनी मागील आठवडय़ात ३०० रुपये आणि आकाराने लहान कांदा अवघ्या १०० रुपये क्विंटल या दराने विकला. चांगला भाव येईपर्यंत कोणी प्रतिक्षा करण्यास तयार नाही. गतवर्षी साठवणूक करणाऱ्यांचे हात पोळले गेले होते. सद्यस्थितीत पावसाला कधीही सुरूवात होईल. साठवण्याची व्यवस्था नाही आणि साठवणूक करूनही उपयोग होत नाही. त्यामुळे बहुतेकांना कांदा बाजारात नेण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे आहेर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *