रेल्वे प्रवाशांच्या नाकात शौचालयांची दुर्गंधी

रेल्वे प्रवाशांच्या नाकात शौचालयांची दुर्गंधी

देशभरात स्वच्छता मोहिमेची तुतारी अगदी जोराने फुंकली जात असताना रेल्वेने देखील यामध्ये री.. ओढत स्थानकात बॅनरबाजी केली. मात्र वर्षभरानंतर रेल्वे स्थानके चकाचक होण्याऐवजी भकास झाल्याने रेल्वेस्थानकांतील शौचालयांच्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना स्थानकातील शौचालयाजवळून ये-जा करताना नाकाला रुमाल धरण्याची वेळ आली आहे. एकीकडे डिलक्स टॉलयेटसारख्या संकल्पना राबवत असताना दुसरीकडे मात्र स्थानकात असलेल्या शौचालयांची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.  मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांत शौचालयांची दुरवस्था ही आजही कायम आहे.

पश्चिम रेल्वेवर जवळपास २३५ शौचालये आहेत. मात्र यामधील अनेक शौचालये दुरवस्थेत आहेत. काही शौचालये ही फलाटांवर असल्याने येणा-या दुर्गंधीमुळे प्रवासी त्या परिसरात उभे राहणे देखील टाळतात. एलफिन्स्टन रोड स्थानकातील फलाटावर असलेले शौचालय, तर वांद्रे फलाट क्रमांक ६ व ७ नंबर असलेल्या शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे आढळतात. सामान्यांच्या नजरेस या गोष्टी येत असताना रेल्वे यंत्रणेची मात्र याकडे डोळेझाक होताना दिसत आहे. मध्य रेल्वेची अवस्था देखील काही वेगळी नाही. ठाणे, कुर्ला यांसारख्या स्थानकांत डिलक्स टॉयलेटची संकल्पना राबवत असताना याच स्थानकात असलेल्या शौचालयांच्या दुरवस्थेकडे मध्य रेल्वे प्रशासन मात्र डुंकूनही पाहत नाही.

मध्य रेल्वेवरील परळ, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, दिवा यांसारख्या स्थानकातील परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. दिवसेंदिवस परळ स्थानकातील प्रवासी संख्या वाढत असताना या स्थानकातील शौचालयावर छत देखील नाही. कुर्ला, गोवंडी, मानखुर्द स्थानकांची परिस्थिती देखील काही वेगळी नाही. दिवा स्थानक तर मध्य रेल्वेच्या अस्वच्छ स्थानकांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचे जंक्शन झाले आहे. सहा फलाटांच्या या स्थानकाकरिता रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी केवळ एक शौचालय उपलब्ध करून दिले आहे. त्या ठिकाणची स्वच्छता पाहिल्यास शोधून देखील सापडणार नाही इतकी अस्वच्छता या ठिकाणी पसरलेली असते. या ठिकणाहून ये-जा करताना देखील प्रवाशांचा श्वास गुदमरतो. पावसाळ्यात तर शौचालयाबाहेर फलाटावर गुडघाभर पाणी साचलेले असते. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असताना केवळ ठरावीक स्थानकात सुविधा देऊन गाजावाजा करणा-या रेल्वे प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *