वय वर्षे ६०, १० महिन्यांत ५ वेळा गरोदर!

वय वर्षे ६०, १० महिन्यांत ५ वेळा गरोदर!

६० वर्षांची म्हातारी १० महिन्यांत ५ वेळा गरोदर… वाचून हबकलात ना? तुम्हा-आम्हाला थोडं अजब वाटेल. पण उत्तर प्रदेशातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी हा अजब-गजब घोटाळा ‘ठरवून’ घडवून आणला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेत काळेबेरे असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. या चौकशीत एक ना अनेक अचंबित करणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. एक महिला चार महिन्यांत तब्बल तीन वेळा गरोदर राहिल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. तर आणखी एक ६० वर्षांची वृद्ध महिला १० महिन्यांत ५ वेळा गरोदर राहिल्याचे दाखवण्यात आले आहे. यातून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी रग्गड कमाई केल्याचे उघडकीस आले आहे.

किरकोळ पैशांची लालूच दाखवून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी परिसरातील महिलांना जननी सुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या पैशांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास सांगतात. मिळणाऱ्या पैशांतून हे कर्मचारी आपला ‘हिस्सा’ वाटून घेतात. एकट्या बौंदी पीएचसी येथील आरोग्य केंद्रात अशा प्रकारची २०० बोगस प्रकरणे उघड झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोगस प्रकरणे कशी आली उजेडात?

बदायूँमधील आशादेवी ही महिला चार महिन्यांत तब्बल तीन वेळा जननी सुरक्षा योजनेंतर्गत मिळालेले धनादेश घेऊन बँकेत गेली. तेथील बँक अधिकाऱ्यांना आशादेवींचा संशय आल्यानंतर त्यांनी याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. त्यात अशा प्रकारची अनेक बोगस प्रकरणे समोर आली.

दोषींवर कडक कारवाई होणार

‘या प्रकरणाशी संबंधित सार्वजनिक आरोग्य केंद्रांतील सर्व नोंदी आम्ही पाहिल्या आहेत. आता बँकांच्या अहवालाची वाट पाहत आहे. यात दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,’ असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. सुबोध शर्मा यांनी सांगितले. माता आणि मुलाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी जननी सुरक्षा योजनेंतर्गत मातेला १४०० रुपये दिले जातात. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे या योजनेचा गैरफायदाच अधिक घेतला जात आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *