अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ

खालापूर तालुक्यातील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत अल्पवयीन मुलाला मारहाण करून त्याचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुरुकुलमधील दोन कर्मचाऱ्यांविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन १३ वर्षीय मुलगा मुंबई चेंबूर येथील राहणारा असून, तो खालापूर तालुक्यातील आसरे येथील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत शिक्षणासाठी वसतिगृहात राहत होता. २९ मार्च २०१७ रोजी रात्री हा अल्पवयीन मुलगा मस्ती करतो म्हणून त्या ठिकाणी असलेले कर्मचारी दर्शित भुत व यश विराणी या दोघांनी त्याला मारहाण करून गुप्तांगाला चिमटे घेतले. त्यानंतर शाळेला सुटी लागल्यानंतर घरी गेल्यावर पीडित मुलाने सर्व प्रकार पालकांना सांगितला. मुलाच्या बाबतीत घडलेला प्रकार ऐकून हादरलेल्या पालकांनी तातडीने गुरुकुल शाळा गाठत व्यवस्थापनाकडे तक्रार केली; परंतु एक ते दीड महिना होऊनही व्यवस्थापनाने ही घटना गांभीर्याने न घेता, दोन्ही कर्मचारी गुजरात येथे गेले आहेत सांगत पीडित मुलाच्या पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर संतप्त पालकांनी खालापूर पोलीस ठाणे गाठत मुलाला मारहाण करून त्याचा लैंगिक छळ करणाऱ्या दर्शित भुत व यश विराणीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार खालापूर पोलिसांनी गुरुकुल इंटरनॅशनल शाळेच्या कर्मचाऱ्यांविरोधात बालकांचे लैंगिक अपराध संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास एपीआय पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *