राज्यात हृदयविकाराच्या रुग्णांत वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २४ हजार रुग्णांची भर; केवळ मुंबईतच ३३ हजारांहून अधिक रुग्ण

बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव व वाढणारा ताणतणाव यामुळे राज्यभरात ह्रदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. २०१६-१७ या वर्षांत राज्यभरात ५४,१९६ ह्रदयविकार झालेल्या रुग्णांची नोंद झाली असून गेल्या वर्षी ही संख्या ३०,२०८ इतकी होती. यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ हजार हृदयविकार रुग्णांची वाढ झाली असून सरकारी रुग्णालयातील ही आकडेवारी चिंताजनक आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रिमा लागू यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. यापूर्वी अभिनेत्री अश्विनी एकबोटे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. राकेश सिन्हा यांचेही ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. डॉ. राकेश सिन्हा हे गेल्या वर्षी मुंबई मॅरेथॉनसाठी वांद्रे येथील जॉगर्स पार्कमध्ये धावण्याचा सराव करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. दररोज १० किलोमीटर धावण्याचा सराव, योग्य आहार, निरोगी व सुदृढ शरीरयष्टी असतानाही सिन्हा यांना जीवघेण्या हृदयविकाराने ग्रासले कसे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. हृदयविकाराच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईमध्ये झाली आहे.

मुंबईत २०१६-१७ या वर्षांत ३३,०१५ इतक्या ह्रदयविकार रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात ह्रदयविकाराच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक असून ही संख्या अशीच वाढत राहिली तर २०२० या वर्षांपर्यंत सर्वाधिक ह्रदयविकाराचे रुग्ण भारतात असतील. विविध उपक्रमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून लवकर या आजारावर निदान करणे व त्यावर उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे.

मद्यपान, धूम्रपान, स्थूलता या कारणांमुळे ह्रदयविकार होतो. त्याबरोबर सध्याच्या काळात बदलती जीवनशैली, अवेळी खाणे, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप यामुळे ह्रदयावर अतिरिक्त ताण येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *