मान्सूनपूर्व पावसाने सिंधुदुर्गात नुकसान

गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी चार दिवस अगोदर अंदमानात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर गेले दोन तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधून मधून बरसत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने आज मालवणला जबरदस्त तडाखा दिला. आज पहाटे ३ वाजल्यापासूनच विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट करीत आलेल्या वरूणराजाने सकाळी वादळी वाऱ्याला सोबत घेत मालवणवासीयांची िनद हराम करून सोडली. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास छत्रपतींची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गावरील भगवा ध्वज वादळी वाऱ्यामुळे कोलमडून तटाच्या आश्रयाला गेला. तर धुरिवाडा येथील हॉटेल सायबा जवळील रस्त्यावर चालत्या वॅगनार गाडीवर माड कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत चारजण बचावले. या दुर्घटनेत गाडीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. चिंदर सडेवाडी येथे दोन घरांवर वीज पडून विद्युत उपकरणे जळाली. तर वीज पडल्याने दोघेजण किरकोळ जखमी झाले. तर अनेक ठिकाणी माड मोडून पडल्याचे वृत्त आहे.

गेले दोन तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण वगळता मान्सून पूर्व पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. मालवणात मात्र मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला नव्हता. आज पहाटे ३ वाजल्यापासून  मान्सून पूर्व पावसाने मालवणात जोरदार सलामी दिली. विजांचा लखलखाट ढगांचा जोरदार गडगडाट करत आलेल्या वरुण राजाने मालवण वासीयांची झोप उडवली. अचानक आलेल्या या पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित झाला. त्यामुळे मालवण वासीयांना उकाड्याला सामोरे जावे लागले. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र तासाभराच्या फरकाने पुन्हा पावसाने हजेरी लावत मालवणला झोडपून काढले. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पावसाबरोबर आलेल्या वीज आणि ढगांनी जणू तांडावनृत्य केले. मालवण- देऊळवाडा आडारी भागात वीज कोसळल्याचे वृत्त आहे. तर वादळी वारयामुळे मालवण वासीय भयचकित झाले होते.

सकाळी वारयाचा वेग ज्यादा होता. वादळी वाऱ्यामुळे शिवप्रेमींची अस्मिता असणारया किल्ले सिंधुदुर्गवर शिवप्रेमींनी उभारलेला पंचधातूंचा भगवा ध्वज वारयामुळे कोलमडला. कोलमडलेल्या या ध्वजाने किल्ल्याच्या तटबंदीचा आसरा घेतला होता. तर किल्ल्यात पर्यटकांच्या दिमातीसाठी असणारी तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने वाऱ्याने जमीनदोस्त केली.

आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास मालवण- कोळंब मार्गावरील धुरिवाडा येथील हॉटेल सायबा नजीक असणारया अनुसया जयवंत आंबेरकर यांच्या जागेतील माड वॅगनार गाडीवर कोसळला. हि गाडी गंगाराम वाकू कोकरे यांच्या मालकीची होती. श्री. कोकरे हे देवगड येथून सकाळी आपली पत्नी दीपाली, मुलगा रोहित आणि दीप यांच्यासह वॅगनार गाडीतुन मालवणला येत होते. कोकरे यांच्या चालत्या वॅगनार गाडीवरच माड कोसळला. भयभीत झालेल्या कोकरे यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवित आपल्या पत्नीला व मुलांना बाहेर काढत आंबेरकर यांच्या घरी हलविले. या घटनेत गाडीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

धुरिवाडा येथे आंबेरकर यांच्या जागेतील माड गाडीवर कोसळल्याच्या दुर्घटनेत हा माड विजवाहिन्यांवरही पडल्याने बाजूचा विजखांबही मोडून रस्त्यावर पडला. विजवाहिन्या व विजखांब कोसळल्याने वीज कंपनीचेही मोठे नुकसान झाले.

धुरिवाडा येथीलच हॉटेल सायबावर माड कोसळल्याने आíथक नुकसान झाले. यामुळे हॉटेलच्या गच्ची तुटून मोठे नुकसान झाले. तसेच धुरिवाडा- सागरी महामार्ग येथील नेरुरकर यांच्या जागेतील माड वाऱ्यामुळे कोसळून जमीनदोस्त झाला.

चिंदर सडेवाडी येथे वीज पडुन घरांचे नुकसान

 चिंदर सडेवाडी येथे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन घरांवर वीज पडली. चिंदर साडेवाडी येथील धोंडू श्रीधर वराडकर यांच्या घराचा मागील सिमेंटचा दरवाजा फोडून विजेने घरात प्रवेश केला. यामुळे वीज मीटर जळाला. यात घरातील वराडकर कुटुंबीय घरच्या दुसरया बाजूला काम करत असल्यामुळे सुदैवाने ते बचावले. तर याच वाडीतील श्रीमती विजयश्री विजय हडकर यांच्या विद्युत मीटरवर वीज पडून घराच्या िभतीला भगदाड पडले. यावेळी िभतीचा उडालेला दगड बसल्याने घरातील वैभव हडकर याच्या डाव्या कानाला दुखापत झाली. तर लगतच असलेल्या ब्राह्मणदेव मंदिराच्या अंगणात असलेल्या तुळशीची पूजा करणारे दिगंबर हडकर यांच्या छातीवर दगड बसून त्यांना दुखापत झाली. ब्राह्मणदेव मंदिराचीही विद्युत जोडणी जळाली. याबाबत चिंदर पोलीस पाटील दिनेश पाताडे, माजी सभापती धोंडू चिंदरकर, वायंगणी स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबू हडकर, ग्रा.प. सदस्य देवेंद्र हडकर, भाऊ हडकर, रणजित दत्तदास आणि आचरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

वीज आणि टेलिफोन यंत्रणा कोलमडली

पहाटे तीन वाजल्यापासून मालवणला पावसाने झोडपाण्यास सुरुवात केल्यानंतर वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरूच राहिल्याने नागरिकांची मोठी गरसोय झाली. तर टेलिफोन यंत्रणाही कोलमडल्यानेही अनेक अडचणी निर्माण झाल्या. सकाळी ११वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हळूहळू जनजीवन सुरळीत झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *