लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 25 जणांचा दुर्देवी मृत्यू

लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 25 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात ही घटना बुधवारी (दि.10) रात्री उशीरा घडल्याचं वृत्त आहे. यामध्ये जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  मृतांमध्ये 8 महीला आणि 5 लहान मुलांचाही समावेश आहे.
येथील सेवर रोडवरील अन्नपूर्णम लग्न सभागृहात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक वादळासह आलेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळ्याचं सांगितलं जात आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे लग्नात आलेल्या पाहुण्यांनी त्या भिंतीचा आसरा घेतला. मात्र, सोसाट्याच्या वा-याचा दबाव सहन न झाल्याने भिंत कोसळली आणि अनेक जण भिंतीखाली सापडले. तर अचानक झालेल्या या घटनेमुळे लग्न सभागृहात गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्याला सुरूवात करून जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केलं.
चेंगराचेंगरी झाल्यामुळेही काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *