काश्मीरमध्ये चिनाब नदीवर येत्या दोन वर्षांत आयफेल टॉवर्सपेक्षा उंच रेल्वे पूल बांधला जाणार आहे. काहीसा वक्राकार असलेला हा पूल बांधण्यासाठी ११०० कोटी रुपये खर्च येणार आहे व त्यात २४ हजार टन पोलाद वापरले जाईल, नदीपात्रापासून ३५९ मीटर उंचीवर तो असेल. ताशी २६० किलोमीटर वेगाने गाड्या त्यावरून धावू शकतील. या पुलासाठी फिनलंड, जर्मनी येथील कंपन्यांनी सल्लागार म्हणून काम करण्याचे मान्य केले आहे.
हा पूल चीनमध्ये बेजपान नदीवर बांधलेल्या २७५ मीटर उंचीच्या शुइबाय पुलाचा विक्रम मोडणार आहे. यात पोलादाचा वापर केला जाणार असून ते उणे २० अंश सेल्सियस तपमान व ताशी २५० कि.मी. वेग सहन करू शकेल.
वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी त्यात संवेदक असतील व वाऱ्याचा वेग ताशी नव्वद किलोमीटर झाल्यास मार्ग तांबडा होऊन रेल्वे वाहतूक थांबवली जाईल. यात ६३ मि.मी. जाडीचे स्फोट प्रतिबंधक पोलाद वापरले जाणार असून दहशतवादी हल्ल्यांचा धोका विचारात घेऊन ही उपाययोजना केली आहे. त्याचे खांबही काँक्रिटचे असतील पण ते स्फोट प्रतिबंधक राहणार आहेत. धोक्याच्या परिस्थितीत प्रवाशांचे रक्षण करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा वापर केला जाणार आहे.
