मूळ भारतीय वंशाच्या मालकीच्या लिबर्टी हाऊस समूहाला विकण्यात आलेल्या ब्रिटनमधील व्यवसायाची प्रक्रिया टाटा स्टीलने पूर्ण केली आहे. १० कोटी पौंडमध्ये हा व्यवहार झाला आहे.
वाढत्या तोटय़ाचा भार उचलणाऱ्या टाटा समूहातील टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील व्यवसायाच्या विक्रीची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या अंतर्गत दक्षिण यॉकशायरस्थित तसेच रोथरहॅम, ब्रिन्सवर्थ, स्टॉकब्रिज येथील स्टील प्रकल्प विकण्यात आले आहेत. त्याचबरोबर ब्रिटनमधील बोल्टन आणि वेडनेसबरी व चीनमधील सुझॉऊ व झिअॅन येथील सेवा केंद्रही लिबर्टी हाऊस ग्रुपला विकण्यात आले आहेत. या सर्व प्रकल्पात एकूण १,७०० हून अधिक कर्मचारी आहेत. कंपन्या विकण्याचा निर्णय घेताना त्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच निवृत्तिवेतन योजनेबाबतचा तिढाही नुकताच सोडविण्यात आला होता.
टाटा स्टीलने २००७ मध्ये ब्रिटनमधील कोरस खरेदी केल्यानंतर आतापर्यंत १.५ अब्ज पौंडची गुंतवणूक या भागात केली आहे. त्यानंतर दशकभरानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये ब्रिटनमधील स्टील व्यवसाय विकण्याच्या अंतिम निर्णयाप्रत कंपनी आली.
