अक्षय्य तृतीयेदिवशी चोरट्यांनी लुटले सोने

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तळेगावमध्ये हाय प्रोफाइल सोसायटीत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. चोरट्यांनी तळेगाव येथील फ्लोरा सिटी येथील सदनीकेचे दार तोडून घरातील तब्बल ९५ तोळे सोने आणि वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना आज दुपारी सव्वा बारा ते तीनच्या दरम्यान घडली. या ठिकाणी दोन घरांमध्ये घरफोडी करण्यात आली असून एका घरातील गेलेल्या मुद्देमालाची माहिती समजू शकली असून दुसऱ्या घरातील किती मुद्देमाल गेला याची माहीती अद्याप समजू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश केदार हे कुवेत येथे काम करतात. सध्या ते भारतात आले असून आज दुपारी सव्वाबारा वाजता घराला कुलूप लावून बाजारात गेले होते. तसेच आज अक्षय्य तृतीया असल्याने तिथूनच पाहुण्यांकडे गेले होते. दुपारी तीन वाजता ते परत आले असता त्यांना घराचा कडी कोयंडा कुणीतरी तोडल्याचे लक्षात आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील ९५ तोळे सोने आणि वीस हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

केदार यांच्यासह त्यांच्या शेजारच्या घरातही चोरी झाली असून त्या घरातून किती रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे हे समजू शकले नाही. घटनास्थळी तळेगाव पोलीस आले असून श्वान पथक आणि फिंगर प्रिन्ट तज्ज्ञ आले आहेत. तळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *