खासदार मनोज तिवारींच्या घरावर हल्ला

दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष, खासदार मनोज तिवारी यांच्या घरावर रविवारी रात्री अज्ञात इसमांनी हल्ला केला असून घरातील काही लोकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. हल्ल्याच्या वेळी मनोज तिवारी घरात नसल्याने बचावले. या प्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली आहे.

मनोज तिवारी यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली. ‘१५९, नॉर्थ अॅव्हेन्यू रेसिडन्स’ या घरावर हा हल्ला झाला. हल्लेखोरांमध्ये आठ ते नऊ लोक होते. त्यांनी केलेल्या मारहाणीत तिवारी यांच्या घरातील दोन माणसं जखमी झाली आहेत. ‘हा हल्ला म्हणजे कोणीतरी माझ्याविरोधात रचलेला कट आहे आणि पोलिसही त्यांना सामील आहे,’ असा आरोप तिवारी यांनी केला आहे.

प्रत्यक्षदर्शींनीही या घटनेला दुजोरा दिला. ७-८ जणांचे टोळके अचानक तिथं आलं आणि त्यांनी तिवारींच्या घरातील लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यांना नेमकं काय हवं होतं हे समजू शकलं नाही. मात्र, त्यांना पोलिसांचीही फिकीर नव्हती, असं एकानं सांगितलं.

नुकत्याच झालेल्या दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळालं आहे. मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखालीच भाजपनं ही निवडणूक लढली होती. तिवारी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निवडणुकीच्या निकालाशी काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *