चिंचवडमध्ये सहा ते सात दुचाकी जळून खाक; शॉकसर्किटमुळे आग लागल्याचा संशय

पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी गाड्यांच्या जाळपोळीचे सत्र अजूनही सुरूच आहे. आज पहाटे चारच्या सुमारास याठिकाणी सहा ते सात दुचाकींना आग लागल्याचा प्रकार घडला. यामध्ये सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. मात्र, या गाड्यांना जाणुनबुजून आग लावण्यात आली का, याची खातरजमा अजूनपर्यंत झालेली नाही. तर दुसरीकडे शॉकसर्किटमुळे ही लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीही पिंपरी-चिंचवड परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आग लावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे चारच्या सुमारास गुरुद्वारा चौक, वैष्णोदेवी मंदिराजवळ चिंचवड येथे एका दुचाकीला आग लागली होती. त्यावेळी स्थानिकांकडून अग्निशामन दलाला याबद्दलची माहिती देण्यात आली. मात्र, अग्निशामन दलाची गाडी घटनास्थळी येईपर्यंत इमारतीच्या पार्किंग परिसरात उभ्या घेतलेल्या आणखी पाच दुचाकींना पेट घेतला. या दुर्घटनेत सहा ते सात दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंग परिसरातील लाईटचे मीटर असलेला बॉक्स आणि वायर्सही पूर्णपणे जळाल्याचे निदर्शनास आले आहे .त्यामुळे ही आग शॉकसर्किटमुळे लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. यापूर्वी १० फेब्रुवारी २०१७ रोजी अशाचप्रकारे पिंपळे गुरव येथेदेखील शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यामध्ये इमारतीच्या खाली पार्क केलेल्या आठ दुचाकी जळाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *