सांगली जिल्ह्य़ाच्या जत तालुक्यातील खिलारवाडी येथे कोडलकर दाम्पत्याने कर्जाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्य़ाच्या घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथील पती-पत्नीनेही स्वतला संपवल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
जालना जिल्ह्य़ातील रामसगाव येथील रामजी बापूराव रणमळे (वय ३६) आणि रत्नमाला अशी या आत्महत्या करणाऱ्या दाम्प्त्याची नावे आहेत. रत्नमालाने विहिरीत उडी मारून तर रामजीने विषप्राशन करून आत्महत्या केली असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत. रामजीच्या नावावर सहा एकर तर त्यांच्या पत्नीच्या नावावर तीन एकर शेतजमीन आहे. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु त्याची परतफेड करणे शक्य नव्हते. शेतीसाठी पाइपलाइन, त्याचप्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी त्यांना आणखी कर्जाची आवश्यकता होती. परंतु अगोदर घेतलेल्या कर्जाची थकबाकी असल्याने बँकेकडून पुन्हा कर्ज मिळण्याची शक्यता नव्हती. ही दुर्दैवी घटना घडण्याच्या दिवशी रामजी आणि रत्नमाला सायंकाळपर्यंत शेतात काम करीत होते, असे सांगण्यात येते. त्यांच्या मागे दहा वर्षांची एक मुलगी तसेच सहा व चार वर्षे वयाची दोन मुले आहेत. शनिवारी रात्री उशिरा रामजी आणि रत्नमाला यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथे आणण्यात आले होते. रविवारी दुपारी वडीरामसगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोंदी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी या संदर्भात सांगितले, रामजी रणमळे आणि त्यांच्या पत्नीने कर्जबाजारीपणा आणि शेतीमधून उत्पन्न मिळत नसल्यामुळे आत्महत्याचा मार्ग स्वीकारला असून तो दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. शेतीतून लागणाऱ्या खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नाही. शेतीमालास उत्पादन खर्चाइतका भावही मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. काही दिवसांपूर्वी अंबड तालुक्यातील रुई येथील एका शेतकऱ्यानेही कर्जफेड करता येत नाही म्हणून आत्महत्या केली आहे.