वागळे परिसरात दोन दिवसाआड पाणी

उल्हास नदीतील पाणी दूषित झाल्याच्या शक्यतेनंतर काही काळासाठी बंद करण्यात आलेल्या पाणीवितरणाचा परिणाम ठाणे शहरातील काही भागांत अजूनही दिसत आहे. शहराच्या मुख्य भागात मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, किसन नगर आणि इंदिरानगर या भागांत दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून येथील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वी स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीसाठय़ात दूषित पाणी आढळल्याने शहरातील सर्व पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर शहरातील मुख्य भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला; परंतु वागळे इस्टेट, इंदिरानगर, लोकमान्यनगर परिसरात पाणीपुरवठा अद्याप पूर्ववत झालेला नाही. अशातच जय भवानी नगर येथे वीजपुरवठय़ात बिघाड होत असल्याने त्याचा परिणाम पाणीवितरणावर होत असल्याचे कनिष्ठ अभियंता माधव जांगडे यांनी सांगितले. याशिवाय श्रीनगर येथील पाण्याच्या टाकीचे व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम सुरूआहे. परिणामी या भागात अत्यंत अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. लोकमान्यनगर, इंदिरानगर, वागळे ईस्टेट हा परिसर डोंगराच्या पायथ्याशी येतो. मुख्य शहरापासून लांब असलेला हा परिसर चढणीच्या मार्गावर आहे. परिणामी पाणीपुरवठा झाल्यास या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असतो.

वीजकपातीचा फटका

या भागातील इमारतींमध्ये पाणीपुरवठा झाल्यावर इमारतीमध्ये गच्चीवर असणाऱ्या टाक्यांमध्ये मशीनच्या माध्यमातून पाणी चढवले जाते. त्यानंतर घरोघरी पाणीपुरवठा होत असतो. मात्र इमारतींच्या टाक्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी विजेची आवश्यकता असते. महापालिका प्रशासनाकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित असल्यास इमारतींच्या टाक्यांमध्ये पाणी चढत नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई वाढत असल्याचे लोकमान्यनगर परिसरात राहणारे सुनील गोरडे यांनी सांगितले.

पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ

गेल्या काही दिवसांपासून पाणीकपातीची मोठी समस्या भेडसावू लागल्याने स्वयंपाकासाठी शिळे पाणी वापरणे शक्य नसते. पंधरा दिवसांपासून या भागात पाणीपुरवठा पुरेसा होत नाही. आठ दिवसांपूर्वी सलग दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा झालेला नाही, अशा वेळी स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्या लागल्या होत्या, असे येथील नागरिकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *