मेरठ-लखनऊ राज्य राणी एक्स्प्रेसचे ८ डबे रूळांवरून घसरले; १५ जण जखमी

उत्तर प्रदेशमधील रामपुर येथे शनिवारी सकाळी मेरठ-लखनऊ राज्य रानी एक्स्प्रेसचे डबे रूळांवरून खाली घसरून अपघात झाला. आज सकाळी ८.१५च्या सुमारास रामपुरच्या कोसी पुलावर ही घटना घडली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यासाठी पर्यायी गाडीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नीरज शर्मा यांनी दिली. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार तर इतर जखमींना २५ हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *