कुलभूषण जाधव यांना वाचवा! ऑल इंडिया रेडिओची थेट पाकमध्येच मोहीम

नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याने भारतात तीव्र पडसाद उमटले असतानाच जाधव यांच्या समर्थनार्थ ऑल इंडिया रेडिओने (AIR) थेट पाकिस्तानमध्ये मोहीम सुरु केली आहे. ऑल इंडिया रेडिओच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील श्रोत्यांना नजरेसमोर ठेवून कार्यक्रमांमधून वारंवार हा मुद्दा प्रभावीपणे मांडला जात आहे.

ऑल इंडिया रेडिओच्या परराष्ट्र विभागाकडून दररोज सात कार्यक्रमांचे प्रसारण होते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील श्रोत्यांसाठी या कार्यक्रमांची आखणी केली जाते. पश्तून, बलूची, पंजाबी, उर्दू, सिंधी आणि सरैकी या भाषांमधून हे कार्यक्रम चालवले जातात. सिंध, पंजाब आणि बलूच या भागांमधून कार्यक्रमांना सर्वाधिक श्रोते असतात अशी माहिती अधिकारी देतात.
श्रोत्यांची संख्या लक्षात घेता ऑल इंडिया रेडिओने कार्यक्रमांमधून कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘प्रवाशाला ठार मारणे हे इस्लाम धर्मानुसार पाप आहे. अशा प्रवाशाला अल्लाहची सहानूभूती मिळते’ अशी भावनिक साद घालत कुलभूषण यांना झालेली शिक्षा चुकीची असल्याचे पटवून दिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *