मुंबईची ‘पहिली लोकल’ १५० वर्षांची!

बईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेला बुधवार, १२ एप्रिल रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. १८६७ रोजी याच दिवशी विरार ते बॅक बे ही पहिलीवहिली लोकल गाडी धावली होती. त्या आधी १४ वर्षे बोरीबंदर ते ठाणे यांदरम्यान धावलेली देशातील पहिली गाडी ही लोकल सेवा म्हणून ओळखली गेली नव्हती. विशेष म्हणजे लोकल सेवेचा उल्लेख १८६५च्या फेब्रुवारीत पहिल्यांदा करण्यात आला. दुर्दैवाची बाब म्हणजे हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्याचे औचित्यही पश्चिम रेल्वेला बाळगता आले नाही आणि मुंबईच्या लोकल सेवेची १५० वी वर्षपूर्ती इतर दिवसांप्रमाणेच दगदगीत साजरी झाली. १६ एप्रिल १८५३मध्ये बोरीबंदर ते ठाणे यांदरम्यान देशातील पहिली रेल्वे धावली. ही गाडी लोकल गाडी नव्हती. १ फेब्रुवारी १८६५पासून रेल्वेच्या वेळापत्रकात लोकल गाडय़ांचा समावेश झाला आणि त्यापैकी पहिली गाडी १२ एप्रिल १८६७ रोजी विरारहून पहाटे ६.४५ वाजता बॅकबे स्थानकाच्या दिशेने रवाना झाली. त्या वेळी हे स्थानक सध्याच्या चर्निरोड व ग्रँटरोड या स्थानकांदरम्यान होते. हळूहळू वेळापत्रकात बदल होत पूर्वी ६.४५ वाजता सुटणारी ही गाडी आता ६.५३ वाजता चर्चगेट लोकल म्हणून रवाना होते. त्या वेळी दिवसभरात दोनच फेऱ्या असलेली ही गाडी बॅकबेवरून संध्याकाळी ५.३० वाजता सुटत होती.

सहा डब्यांच्या या गाडीत महिलांसाठी दुसऱ्या श्रेणीचा वेगळा डबा होता. त्याचप्रमाणे धुम्रपान करणाऱ्या प्रवाशांसाठी खास कक्ष राखीव होता. या गाडीत त्या काळी तीन श्रेणी असून सर्वाधिक प्रवासी दुसऱ्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत. त्यासाठी एका फेरीचे भाडे ७ पैसे एवढे होते. तिसऱ्या श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांना ३ पैसे भाडे द्यावे लागत होते. विशेष म्हणजे आता वेगवान गाडय़ा येऊनही त्या काळी विरार ते बॅकबे हा प्रवास पूर्ण करण्यास आतापेक्षा कमी वेळ लागत होता. अर्थात त्या वेळी स्थानकेही कमी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *