मुंबईकन्येची भरारी, रशियात चालवणार ‘मिग-२९’

२०११ मध्ये वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी विमान चालवण्याचं लायसन्स मिळवून देशातील सर्वात तरुण शिकाऊ पायलट ठरलेली मुंबईची मुलगी आएशा अझीझ आता ‘न भुतो’ पराक्रम करणार आहे. रशियाच्या सोकूल एअरबेसवरून ‘मिग-२९’ हे अद्ययावत लढाऊ विमान उडवण्यासाठी २१ वर्षीय आएशा सज्ज आहे. ही भरारी घेणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरणार आहे.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या महिला आता सीमेवर प्राणांची बाजी लावून देशाचं रक्षणही करत आहेत. परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणींनी, स्त्रियांनी विविध क्षेत्रांत यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. या कर्तबगार महिलांच्या यादीत आएशानंही मानाचं स्थान मिळवलंय.

आएशाचं कुटुंब वरळीत राहतं. तिचे वडील उद्योगपती आहेत. ‘मी माझ्या पालकांसोबत पहिल्यांदा विमानात बसले, तेव्हा एक वेगळंच स्वातंत्र्य अनुभवलं होतं. आकाशात स्वच्छंद विहार करण्याचा निर्णय तेव्हाच घेतला होता’, अशी प्रतिक्रिया आएशानं व्यक्त केली. गेल्या वर्षी तिनं बॉम्बे फ्लाइंग क्लबमधून ‘एव्हिएशन’ची पदवी मिळवली. या प्रशिक्षणादरम्यान तिनं आत्तापर्यंत २०० तास सिंगल-इंजिन एअरक्राफ्ट चालवलं आहे. या यशाचं श्रेय ती आपल्या वडिलांना – अब्दुल अझीझ यांना देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *