मृतदेह चार तास झाडाला लटकलेला
मूल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सुरू होण्याच्या अवघ्या एक तासापूर्वी तेथून आठ किलोमीटरवर असलेल्या भादुर्णी येथे मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याने उमेश महादेव चायकाटे (५०) या अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मुख्यमंत्री सभेत राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीवर पोटतिडकीने बोलत असताना पोलीस मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात तैनात असल्यामुळे शेतकऱ्याचा मृतदेह जवळपास चार तास झाडाला लटकून होता.
राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राज्याचे अर्थ, नियोजन तथा वन मंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. या जाहीर सभेत मुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेवर अतिशय पोटतिडकीने बोलत होते. शेतकऱ्यांचे उत्पादन आम्ही दुपटीने वाढवू तसेच त्यांना कर्जमुक्तीसोबतच शेती क्षेत्राशी निगडित चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगत होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना भादुर्णी येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता अल्पभूधारक शेतकरी उमेश महादेव चायकाटे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.पोलीस मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेच्या बंदोबस्तात असल्यामुळे ते घटनास्थळी पोहोचू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा मृतदेह चिंचेच्या झाडावर चार तास लटकलेला होता. उमेश चायकाटे यांना तीन भाऊ असून फक्त एक एकर जमीन आहे. मागील वर्षी मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नातेवाईकांकडून उसनवार पैसे घेतले होते. मात्र, पैसे परत करण्यास असमर्थ ठरत असल्याने त्यांच्या मनावर विपरित परिणाम झाला होता. उपसरपंच संतोष रेगुंडवार यांनी याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली. मात्र, नातेवाईकाला घटनेची माहिती द्यायला सांगा, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती कुणीच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविली नाही.
