मेट्रो २ आणि मेट्रो ७ च्या विस्तारानंतर आता मेट्रो ४ चाही विस्तार होणार आहे. राज्य सरकारने याबाबत घोषणा केली आहे. यामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडच्या नागरिकांना थेट सीएसटीपर्यंत मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे.
बहुचर्चित वडाळा – घाटकोपर – ठाणे -कासारवडवली या मेट्रो ४ चा पल्ला वाढवण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. मेट्रो ४ आती सीएसटीतील जीपीओपर्यंत वाढवली जाणार आहे. म्हणजेच मेट्रो ४ चा मार्ग आणखी १० किलोमीटरने वाढणार आहे.
मेट्रो ४ कुठून कुठेपर्यंत वाढणार?
वडाळ्यापासून सुरु होणारी मेट्रो आता थेट सीएसटी रेल्वे स्थानकाजवळच्या जीपीओपर्यंत नेली जाईल. यामुळे मेट्रो ४ च्या मार्गात वडाळा ते जीपीओ असा सुमारे १० किमीचा पल्ला वाढला आहे. हा मार्ग हार्बर रेल्वे मागार्ला समांतर पी. डिमेलो मार्गावरुन जाणार आहे, तर दुसरीकडे घोडबंदर मार्गावर कासारवडवलीपर्यंत असलेली मेट्रो ४ ही गायमुखपर्यंत ५ किमी अंतर वाढवले जाणार आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील आणखी मोठ्या लोकवस्तीला या मेट्रोचा फायदा होईल.
मेट्रो ४ चा मार्ग दोन्ही बाजूंनी वाढवला गेला असल्याने थेट ठाणे ते सीएसटी असा मेट्रो प्रवास भविष्यात शक्य होणार आहे. मेट्रो ४ च्या प्रकल्पाचा मूळ खर्च सुमारे १४ हजार ५०० कोटी रुपये होता. मार्ग वाढवल्याने खर्च आणखी ५ हजार कोटी रुपयांनी वाढणार आहे, पण ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो ४ च्या नव्या मागार्चा प्रकल्प आराखडा काही दिवसांत निश्चित होणार असून, डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मेट्रो ४ चे भूमिपूजन २० डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.