पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कोथरूड व पुणे स्टेशन डेपोमध्ये गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रात्रपाळीला असलेले नऊ कर्मचारी ऑनड्यूटी झोपल्याचे आढळले. त्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यांचे निलंबन करण्याचा आदेश दिला. मुंढे यांनी स्वत: सर्व १३ डेपोंमध्ये रात्री तपासणी केली.
कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मुंढे यांची आदर्श आचारसंहिता घालून दिली आहे. या आचारसंहितेचे पालन होत आहे किंवा नाही याकडे ते काटेकोरपणे लक्ष देत आहेत. कामाची वेळ बदलल्यानंतर उशिरा येणाऱ्या ११७ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर कामावर येऊन झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडगा उगारला आहे. निलंबन करण्यात आलेलेल्या नऊ जणांपैकी दोन चालक असून सात कर्मचारी हे वर्कशॉपमधील आहेत. यामध्ये कोथरूडचे चार व पुणे स्टेशन डेपोचे पाच कर्मचारी आहेत. या कर्माचाऱ्यांची रात्रपाळीची वेळ रात्री १० ते सकाळी सहा अशी होती. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.