सातवी पास ‘डॉक्टर’चे कारनामे

डोंबिवलीतील सातवी पास बोगस महिला डॉक्टर अनिता सावंत ऊर्फ अनिता लोंढे ऊर्फ अनिता कश्मीरी हिचे अनेक काळे कारनामे तिच्या अटकेनंतर समोर येत आहेत. कल्याण फाटा येथेही ती लवकरच दुसरे नर्सिंग होम सुरू करणार होती. उद‍्घाटनासाठी सज्ज असलेले हे नर्सिंग होम सील करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याने दिली. धक्कादायक बाब म्हणजे डोंबिवलीतील नर्सिंग होममध्ये आतापर्यंत सुमारे १५ ते २० महिलांची प्रसूती करण्यात आल्याची बाबही गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आली आहे.

डोंबिवलीतील मानपाडा गावात असलेल्या अनिता एस. ऊर्फ अनिता पोपट सावंत ऊर्फ अनिता लोंढे ऊर्फ अनिता कश्मीरी या बोगस डॉक्टरच्या साईबाबा नर्सिंग होमवर गुन्हे शाखा आणि कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी छापा टाकून तिला अटक केली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याप्रकरणी अनिताचा साथीदार मोहम्मद सोहेल कश्मीरी याला देखील अटक क‍रण्यात आली आहे.

‘नर्स’ बनली डॉक्टर

डोंबिवलीत नर्सिंग होम थाटून ‘रुग्णसेवा’ करणाऱ्या अनिताने याआधी नर्स म्हणून आठ वर्षे काम केल्यानंतर २०१४मध्ये गोवंडीच्या बैंगणवाडीत दवाखाना सुरू केला होता. तिथे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर वर्षभराने अनिताने थेट डोंबिवली गाठले आणि तिथे साईबाबा नर्सिंग होम सुरू केले.

बैंगणवाडीतील दवाखान्यात एका महिला रुग्णाला इंजेक्शन दिल्यानंतर रिअॅक्शन होऊन त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे अनिताविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर तिने वर्षभर दवाखाना बंद ठेवला आणि त्यानंतर थेट डोंबिवलीत जाऊन साईबाबा नर्सिंग होम सुरू केले. या नर्सिंग होममध्ये महिलांची प्रसूती केली जात होती. आतापर्यंत १५ ते २० प्रसूती केली असल्याचे तपासात समोर आल्याचे गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. या सर्व प्रसूती यशस्वी झाल्या असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. एखाद्या अधिकृत रुग्णालयाप्रमाणे हे नर्सिंग होम बनवण्यात आले होते. सर्दी, खोकला यावरही ती औषधे देत होती. सिझरिंग करायचे असल्यास बाहेरून तज्ञ डॉक्टरांना बोलावले जात होते. ही गोष्ट तपासात निष्पन्न झाली असून कोणत्याही परवान्याविना चालणाऱ्या या साईबाबा नर्सिंग होममध्ये मुंब्रा येथील एक डॉक्टर काम करत होता. मात्र नंतर या डॉक्टरने काम सोडले. वेगवेगळी ५७ प्रकारची औषधे नर्सिंग होममध्ये सापडली असून ही औषधे कोणी पुरवली याविषयी तसेच या ‌नर्सिंग होममध्ये गर्भपातही केले जात होते का? याचाही तपास सुरू आहे. अनिता कल्याण फाटा येथेही साईबाबा या नावानेच नवीन नर्सिंग होम लवकरच सुरू करणार होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाली. कल्याण फाट्यावरील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जागा भाड्याने घेऊन रुग्णालयाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *