३० जूनचा दिवस ‘सेकंदाने’ वाढणार

३० जूनचा दिवस ‘सेकंदाने’ वाढणार

मंगळवार, ३० जून २०१५ हा दिवस १ सेकंदाने वाढणार आहे. अमेरिकन अवकाश संस्था ‘नासा’ने याबाबतची माहिती दिली आहे. पृथ्वीचा स्वत:भोवती प्रदक्षिणा मारण्याचा वेग यादिवशी कमी होणार असून त्यामुळेच हा सेकंद वाढणार असल्याचे नासाने म्हटले आहे.

पृथ्वी, चंद्र आणि सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण आणि विद्युतचुंबकीय प्रभाव निर्माण होऊन त्यामुळे पृथ्वीच्या प्रदक्षिणेचा हा वेग मंदावणार आहे. सर्वसामान्यपणे एका दिवसात ८६ हजार ४०० सेकंद असतात. पण या दिवशी मात्र एक सेकंद वाढणार आहे. त्यामुळे जागतिक वेळेतही आजचा दिवस ‘२३:५९:५९’ ने संपण्याऐवजी ‘२३:५९:६०’ ने संपून त्यानंतर १ जुलैला सुरुवात होणार आहे. मात्र त्यामुळे संगणकीय वेळेत बिघाड होऊन या वाढीव १सेकंदाने गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे.

अनेक वर्षातून एकदा घडणा-या या घटनेला ‘लीप सेकंद’ असे नाव यापूर्वीच देण्यात आले आहे. १९७२ मध्ये या लीप सेकंदाचा शोध लागल्यानंतर हे लीप सेकंद वर्षाच्या शेवटी वापरले जायचे. वर्षभराचा एकूण कालावधी पाहता त्यात काही वेळा वेळेच्या मोजमापात तफावत निर्माण होत असल्याने त्याठिकाणी लीप सेकंद टाकून वर्ष संपवण्याची पद्धत त्यावेळी वापरली जात होती.

मात्र २००० सालापासून ही तफावत पडणे कमी झाल्याने लीप सेकंदही कमी होऊ लागले. मंगळवारी वेळेत येणारा सेकंदाचा फरक हा २००० ते २०१५ या १५ वर्षातला फक्त चौथ्यांदा आलेला फरक आहे. यापूर्वी वारंवार येणारे हे फरक मागील काही वर्षात कमी झाल्याचे यावरून स्पष्ट झाल्याचेही नासाने म्हटले आहे.

या लीप सेकंदामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात जरी काहीही फरक पडणार नसला, तरी आंतरराष्ट्रीय वेळेनुसार चालणा-या उपकरणांवर त्याचा परिणाम होणार आहे. या एक सेकंदासाठी ही उपकरणे बंद पडण्याचीही शक्यता असून ज्या मोबाईल फोन्समध्ये वेळ आपोआप अपडेट होते, त्यातही हा फरक जाणवण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *