नोकरी मिळविण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, नाशिकमध्ये पोलीस भरती सुरू असताना एका तरुणाने केवळ ऊंचीमुळे नोकरी जाऊ नये म्हणून डोक्यावर केसांचा नकली विग लावला. त्यांची ऊंचीही बसली. पण एका चाणाक्ष हवालदारामुळे त्याचे बिंग फुटले आणि पकडला गेला.
किसन पाटील असे या तरूणाचे नाव आहे. नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून पोलीस भरती सुरू आहे. त्यामुळे किसन पाटील या तरूणाने त्याची ऊंची १७५ सेंटीमीटरच्यावर दिसावी यासाठी हा बनावट विग घातला. तपासणीवेळी त्याची उंचीही जास्त मोजली गेली. मात्र एका पोलीस कॉन्स्टेबलला संशय आल्यानं त्यानं किसनची पुन्हा नीट तपासणी केली. यावेळी त्याच्या डोक्यावर विग आढळला आणि त्याचं बिंग फुटलं. दरम्यान या प्रकारानंतर किसन पाटील या तरुणाला संपूर्ण भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आलं आहे. तसंच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.