ब्रिटीश संसदेबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकही भारतीय मृत अथवा जखमी झालेला नाही अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रात्री उशिरा दिली. या भीषण हल्ल्यात 5 जण ठार झाले असून, 40 जण जखमी झाल्याची माहिती ब्रिटीश पोलिसांनी दिली. आपण ब्रिटनमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून लंडनमध्ये राहणा-या भारतीयांना सर्व आवश्यक मदत उपलब्ध करुन देऊ असे स्वराज यांनी सांगितले. ज्या व्यक्तींना मदत आणि माहिती हवी आहे त्यांच्यासाठी परराष्ट्रमंत्रालयाने 02086295950 आणि 02076323035 हे दोन दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.
लंडनमधल्या भारतीय दूतावासाने आपल्या नागरीकांना पार्लमेंट स्कवेअरच्या दिशेने न जाण्याचा तसेच मेट्रोपोलिटन पोलिसांच्या वेबसाईटवरुन हल्ल्यासंबंधी अधिक माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारताने लंडन दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. लोकशाहीमध्ये दहशतवादाला अजिबात स्थान नसल्याचे परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. बुधवारी संध्याकाळी संसदेबाहेरच्या परिसरात पादचाऱ्यांना कारने चिरडण्याची, गोळीबार आणि चाकूने भोकसणे अशा तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत.ठार झालेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा सामवेश आहे. दरम्यान हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
ब्रिटनच्या संसदेबाहेरील वेस्टमिंस्टर ब्रिजवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. काही जणांना कारने चिरडण्यात आले. तसेच चाकूने भोकसण्याची घटनाही घडली. यात 40 जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, गोळीबार झाल्याचा मोठा आवाज आल्याची माहिती येथील काही नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, गोळीबार झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संसदेचा परिसर बंद करण्यात आला.. तसेच, या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हाऊस ऑफ कॉमन्सच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले असून, संसदेतमध्ये बंदुकधारी पोलीस दाखल झाले आहेत.